उंब्रज : एका हॉटेल समोर दोन वर्षीचा चिमुकला रडत बसला होता. त्याला नाव व पत्ता सांगता येईना. आईपासून दूरावलेले हे बालक घाबरलेलं. याचवेळी उंब्रज पोलिसांनी याची माहिती मिळाली. पोलिसांनी काही तासातच चक्रे फिरवत सोशल मीडिया, पोलीस गाडीवरील स्पीकरचा वापर करून आईपासून दुरावलेल्या या चिमुकल्याची भेट घडविली. अन् खाकी वर्दीने पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवलं.येथील एका हॉटेल समोर दोन वर्षीय लहान मुलगा रडत असलेला एकाने पाहिले. त्याने तत्काळ उंब्रज पोलीस ठाण्यात फोन केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून त्या चिमुकल्याला पोलीस ठाण्यात आणले. त्याला नाव व पत्ता सांगता येत नव्हता. मुलगा सतत रडत होता. त्यास उंब्रज पोलिसांनी बिस्किटे व खाऊ दिला.त्यानंतर उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी सहायक फौजदार साळुंखे, प्रमोद पाटील, महिला पोलीस सुनिता पवार, कल्याणी काळभोर, प्रतीक्षा बनसोडे, गौरी यादव यांच्याकडे या चिमुकल्याच्या कुटुंबीयांना शोधण्याची जबाबदारी दिली. या टीमने सोशल मीडियाच्या ग्रुपवर या हरवलेल्या चिमुकल्याची माहिती पाठविली. पोलीस गाडीवरील स्पीकरचा वापर करून बाजारपेठेत संबंधित मुलाविषयी पुकारण्यात आले.यामुळे काही तासांतच संबंधित मुलाचा शोध घेणाऱ्या आईपर्यंत ही माहिती पोहोचली. मुलाच्या आईने उंब्रज पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित महिलेने स्वतःचे नाव पिंकी पासवान व मुलाचे नाव प्रियांश पासवान असे सांगितले. हे कुटुंब उत्तरप्रदेशमधील असून, सध्या तासवडे एमआयडीसीमध्ये नोकरीस आहे. पोलिसांनी खात्री करून मुलगा आईच्या ताब्यात दिला. अन् मुलाची व आईची भेट घडविली.
..अन् उंब्रज पोलिसांनी काही तासांतच घडवली माय-लेकरांची भेट; सोशल मीडिया व पोलीस गाडीवरील स्पीकरवरुन दिली हाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 16:40 IST