'अजितदादा' स्वतः बांधणार 'उदयदादां'च्या हातात 'घड्याळ'!
By प्रमोद सुकरे | Updated: April 18, 2025 22:18 IST2025-04-18T22:18:18+5:302025-04-18T22:18:33+5:30
घडतंय बिघडतंय : 'राष्ट्रवादी'च्या 'घड्याळा'ला कराड दक्षिणेत मिळाला नवा 'हात'

'अजितदादा' स्वतः बांधणार 'उदयदादां'च्या हातात 'घड्याळ'!
कराड खरंतर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. अगदी पवारांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली पण त्यांचा चरखा येथे चालला नाही. अन राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला पण कराड-दक्षिणचा गड त्यांना सापडला नाही. याची सल नाही म्हटले तरी पवारांच्या मनात कळत नकळत आहेच. पण आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्ष वाढीसाठी जिल्ह्यात लक्ष घातले असून शनिवारी उदयसिंह पाटलांचा होणारा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश हा एक मोठा प्रवेश मानला जात आहे. स्वतः अजित पवार उपस्थित राहत उदयसिंह पाटलांच्या हातात 'घड्याळ' बांधणार असल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो याचे प्रत्यंतर नेहमीच येते. कराड तालुक्यात्ही असेच घडतंय. गेल्या ५० वर्षाची राजकीय परंपरा असणाऱ्या, काँग्रेसची बूज राखणाऱ्या माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील यांचे पुत्र एड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासूनचे राष्ट्रवादीचे दक्षिणचा गड काबीज करण्याचे स्वप्न आता तरी पूर्ण होणार का? हे पाहावे लागणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव पाटील- उंडाळकर यांनी सलग ३५ वर्षे कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रवादीचा वारू जिल्ह्यात आला असताना देखील त्यांनी तो दक्षिणेत येऊ दिला नाही. त्याला परतवून लावले. दरम्यानच्या काळात त्यांनी सहकार, विधी व न्याय, दुग्धविकास, पशुसंवर्धन, पुनर्वसन आदी खात्यांचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले. पण पवारांचा करिष्मा दक्षिणेत चालू दिला नाही. पण ज्या विलासराव पाटील- उंडाळकरांनी दक्षिणेत राष्ट्रवादीला येऊ दिले नाही. त्यांच्याच पुत्राला म्हणजे ऍड. उदयसिंह पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देत येथे राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याची चाल अजित पवारांनी केली आहे. आता त्याला किती व कधी यश येणार ? हे पाहण्यासाठी थोडे थांबावे लागणार आहे. एक मात्र नक्की की, अजित पवार आपल्या नव्या शिलेदाराला नक्कीच चांगली ताकद देतील या शंका नाही.
कोण कोण बरोबर जाणार ?
एड.उदयसिंह पाटील यांच्या प्रवेशाच्या वेळी त्यांची कराड दक्षिण, उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघातील रयत संघटना त्यांच्याबरोबर जाईलच. पण याबरोबर काँग्रेसचे कोण कोण कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांना मानणारा काँग्रेसचा कार्यकर्ता जिल्हाभर व्यापलेला आहे. ते कार्यकर्ते उदयसिंह पाटील यांच्या पाठीशी उभे राहणार का? हे ही पहावे लागणार आहे.
'त्या' बंधूंची मध्यस्थी यशस्वी
दिवंगत ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील व विलासराव पाटील- उंडाळकर यांचा ऋणानुबंध संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे.तोच ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी लक्ष्मणराव पाटील यांचे सुपुत्र मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांनी उदयसिंह पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यासाठी मध्यस्थी केली. त्याला अखेर यश आल्याचे दिसत आहे.
अजित पवार काय शब्द देणार?
काँग्रेसची परंपरा असलेले एड. उदयसिंह पाटील- उंडाळकर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत.खरंतर ही माहिती त्यांनी स्वतःच पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना दिली. पण त्यावेळी तुम्हाला अजित पवारांनी काही शब्द दिला आहे का? असे छेडले असता मी त्यांना काही मागितलेले नाही, त्यांनी मला काही देण्याचा शब्द दिलेला नाही. पण त्यांनी माझे पालकत्व स्वीकारले आहे. एवढेच उत्तर देणे त्यांनी पसंद केले. पण शनिवारच्या या मेळाव्यात, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार उदयसिंह पाटलांना काय शब्द देणार का ? याबाबतही त्यांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.