Satara: कुत्रे आडवे आल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली; चालक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 15:52 IST2025-10-01T15:52:33+5:302025-10-01T15:52:51+5:30
आगाशिवनगरात जाधव वस्ती जवळील घटना

Satara: कुत्रे आडवे आल्याने दुचाकी दुभाजकाला धडकली; चालक ठार
मलकापूर : अचानक कुत्रे आडवे आल्याने दुचाकीची दुभाजकाला धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. हा अपघातकराड-ढेबेवाडी मार्गावर आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड येथील जाधव वस्ती जवळ मंगळवारी दुपारच्या सुमारास झाला.
इंद्रजीत अधिकराव कणसे (वय ३६ रा. दत्त शिवम कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांकडून व अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार इंद्रजीत कणसे हे शिवसमर्थ पतसंस्था शाखा तळमावले येथे काम करत होते. ते नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी दुचाकी (एमएच ५० वाय ३२५४) वरून कामावर गेले होते. दुपारी काम आटोपून ते घरी आगाशिवनगर येथे येत होते. कराड-ढेबाडी मार्गावर दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास जाधव वस्ती नजीक आले असता, अचानक दुचाकीच्या आडवे कुत्रे आले. यावेळी कणसे यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकीची दुभाजकाला धडक झाली.
या अपघातात कणसे यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाले होते. अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. कणसे यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात पाठवून दिले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार आकाश मुळे यांच्यासह कर्मचारी तातडीने अपघातस्थळी दाखल झाले. अपघाताचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघाताची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मारुती चव्हाण करत आहेत.