Satara Accident: मित्राचे लग्न; गावदेव दर्शनाहून परतताना कारला समोरुन ट्रकची धडक, दोघे ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:20 IST2025-11-27T15:17:24+5:302025-11-27T15:20:17+5:30
ओगलेवाडी येथे ट्रक, कारची धडक; दोन जखमी

Satara Accident: मित्राचे लग्न; गावदेव दर्शनाहून परतताना कारला समोरुन ट्रकची धडक, दोघे ठार
कराड : पुसेसावळी (ता. खटाव) येथे मित्राच्या लग्न गावदेव दर्शनाचा कार्यक्रम संपवून कारने घरी परत येत असताना चार मित्रांच्या कारला समोरून ट्रकची जोरदार धडक बसली. त्यामध्ये दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर दोनजण जखमी झाला. हा भीषण अपघात बुधवारी रात्री एकच्या सुमारास ओगलेवाडी रेल्वे पुलावर झाला.
कारचालक ओमकार राजेंद्र थोरात (वय २८), गणेश सुरेश थोरात (२५, दोघेही रा. ओंड, ता. कराड) अशी ठार झालेल्या मित्रांची नावे आहे. तर हृषिकेशन कुबेर थोरात (२८ रा. ओंडे), व रोहन पवार (२५) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुसेसावळी येथे मंगळवारी मित्राच्या लग्न गाव देवदर्शनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी चाैघेजण कारने पुसेसावळीला गेले होते. तो कार्यक्रम आटोपून पुन्हा कराडकडे परतत होते. कराड-विटा राज्य मार्गावर बुधवारी रात्री एकच्या सुमारास ओगलेवाडी येथील रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. त्यामध्ये ओमकार व सुरेश हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
दोन्ही वाहनांची धडक इतकी भीषण होती की, कारचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. स्थानिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. कराड शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
ओंड गावावर शोककळा
अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही तरुण ओंड (ता. कराड) येथील रहिवासी आहेत तर जखमी असणारा एक तरुणही ओंडचाच आहे. मात्र, या दोन्ही तरुण मुलांच्या अपघाती मृत्यूने ओंड गावावर शोककळा पसरली. त्या दोघांच्याही पार्थिवावर दुपारी एक वाजता ओंड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मित्राचे लग्न होते बुधवारी
पुसेसावळी (ता. खटाव) येथे बुधवार, दि.२६ रोजी मित्राचे लग्न होते. आदल्या दिवशी हे सर्व मित्र गावदेव दर्शनाचा कार्यक्रमाला गेले होते. तेथून परत येताना ही दुर्दैवी घटना घडली.
बरडजवळ भीषण अपघातात एक ठार
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर बरड (ता. फलटण) येथे मुबंई येथील कोळीवाडा येथून पंढरपूरकडे अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या मिनी ट्रॅव्हल्सवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स दुभाजकावर जाऊन जोरदार आदळली. विशेष म्हणजे या दुभाजकामध्ये रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झाला.जालिंदर लक्ष्मण सस्ते (वय ६०, रा. बरड, ता. फलटण) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.