काशीळला बँक फोडण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: December 1, 2014 00:05 IST2014-11-30T23:09:47+5:302014-12-01T00:05:55+5:30

रोकड सुरक्षित : सीसीटीव्हीत चोरट्याची छबी कैद

Trying to break the cash bank | काशीळला बँक फोडण्याचा प्रयत्न

काशीळला बँक फोडण्याचा प्रयत्न

काशीळ : सातारा तालुक्यातील काशीळ येथे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली बँक आॅफ महाराष्ट्रची शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न काल, शनिवारी रात्री झाला. बँकेतील रोकड सुरक्षित असून, एका चोरट्याची छबी बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि बोरगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गालगत असणाऱ्या बँकेच्या शाखेजवळ राहणारे कुटुंब काल रात्री साडेअकराच्या दरम्यान आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी बँकेजवळ आले असता, एक व्यक्ती बँकेच्या कुंपणामधून घाईगडबडीत बाहेर पडताना दिसला. जवळ जाऊन त्याला हटकले असता तो पळून जाऊ लागला. तरीही ग्रामस्थ आणि जवळील ढाब्याच्या व्यवस्थापकांनी महामार्गावर ट्रकला हात करताना त्याला पकडले आणि चौकशी केली. त्यावेळी उडवाउडवीची उत्तरे देऊन, खोटे नाव सांगून त्याने पोबारा केला.
रविवारी सकाळी सातच्या सुमारास बँकेच्या पुढील बाजूस असणाऱ्या दोन्ही शटरची कुलपे तोडून बँक फोडण्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर खळबळ उडाली. शाखाधिकाऱ्यांनी ही माहिती बोरगाव पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता अंदाजे ३८ ते ४० वर्षांच्या चोरट्याची छबी त्यात आढळून आली. दरम्यान, बँकेच्या परिसरात एक दुचाकी (एमएच ११ एएच ९१३३), लोखंडी गज, कटावणी आढळून आली. ग्रामस्थांनी पकडलेल्या इसमाने दुचाकी आपली नसल्याचे सांगितले होते. मात्र, काही वेळातच त्याच दुचाकीच्या डिकीतून साहित्य बाहेर काढताना याच इसमाला पाहून ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला.

सुरक्षा रामभरोसे...
काशीळमध्ये शासकीय आणि सहकारी तीन बँका आहेत. बँकांच्या दहा ते पंधरा फुटांवरून महामार्ग जातो. मात्र, बँकांच्या परिसरात कोणतीही सुरक्षा नसल्याने शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून बँकेत जमा केलेल्या पैशांची सुरक्षा रामभरोसे आहे.

Web Title: Trying to break the cash bank