सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:50 IST2025-08-25T17:49:51+5:302025-08-25T17:50:43+5:30
जिल्ह्यात दडपशाही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही - मकरंद पाटील

सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
वरकुटे-मलवडी : ‘कोणत्याही क्षेत्रात ठसा उमटवण्याची धमक अन् दुष्काळाशी लढण्याचं बळं माणच्या मातीत आहे. दुष्काळी भागासाठी शेतशिवारात पाणी आणल्याशिवाय या भागचा विकास खऱ्या अर्थाने होणार नाही. उगीच कुणाची उणी धुणी काढण्यापेक्षा काम करणं महत्वाचं आहे. माझ्या बारामतीसारखं माण खटाव भागही शेतीसाठी पुढे गेला पाहिजे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
दहिवडी येथील बाजार पटांगणावर रविवारी सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, उदयसिंह पाटील, सुभाष नरळे, प्रतापराव पवार, वाई बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, रमेश गायकवाड, पृथ्वीराज गोडसे, संजय देसाई, जितेंद्र पवार, सीमाताई जाधव, श्रीराम पाटील, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ, बाबू सूर्यवंशी, सुवर्णा देसाई, बाळासाहेब सोळस्कर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘माण खटाव तालुक्याचे युवा नेतृत्व म्हणून अनिल देसाई यांची जिल्हाभर ओळख आहे. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून ते अनेक वर्षे तालुक्यांचे नेतृत्व करत आहेत. सहकार, सामाजिक राजकीय क्षेत्रातील त्यांचे कार्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला बळकटी देण्याचे कार्य त्यांच्या हातून निश्चित होईल. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रामुख्याने काम करा. दुष्काळ, क्रीडा, उद्योग, शेती, पत्रकारिता यासाठी लढण्याचा गुण या मातीत आहे. त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. या भागात एमआयडीसी निर्माण झाली तर दुष्काळी भाग सावरू शकेल. रस्ते धरणं करत विकास साधला पाहिजे. चांगले रस्ते झाले तर आजूबाजूला व्यवसाय वाढतील इतर जागेला किंमत येईल.’
अनिल देसाई म्हणाले, ‘माण, खटावचा दुष्काळी भागात पहिल्यांदा टेंभूचे पाणी आणण्याचे काम केले. त्यासाठी सोळा गावाचं सोळा दिवस आंदोलन मी दहिवडी तहसील कार्यालयासमोर केले. अर्थमंत्री म्हणून उर्वरित कामासाठी अजित पवार यांनी निधी द्यावा. इथलं प्रशासन सवतीसारखं वागत आहे. माणपूर्व भागात टेंभूचं पाणी आणण्यासाठी सोळा दिवस आंदोलन करून पाणी मिळवून देणारा कार्यकर्ता आहे. टेंभूचे उर्वरित काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिंगणापूर भागात अजूनही पाण्याची मागणी आहे ती पूर्ण करावी. टेंभूचे काम अपूर्णच आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. यावेळी बाळासाहेब सोळस्कर यांनीही मनोगत व्यक्त केले. महेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले.
तुम्ही किती मताने निवडून येता जनतेला माहीत : मकरंद पाटील
‘जिल्ह्यात दडपशाही हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. दडपशाही हुकूमशाही चालू देणार नाही. तुम्ही किती मताने निवडून येता हे जनतेला माहीत आहे परंतु मकरंद पाटील मोठ्या फरकाने निवडून येतात. याला कारण प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची नाळ जोडली गेलेली आहे. या भागात काही प्रमाणावर पाणी आलं असलं तरी येथील जनता प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत जगत आहे. संघर्ष कसा करायचा ते या मातीतल्या माणसाला चांगलंच माहीत आहे,’ असे मंत्री मकरंद पाटील म्हणाले.