Satara: चोरटे घरात घुसले; घरमालकाला मारहाण करून डोळ्यात मिरची पूड टाकली, महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 15:53 IST2025-09-29T15:52:55+5:302025-09-29T15:53:29+5:30
मसूर : खोडजाईवाडी येथे दोन चोरट्यांनी घरात घुसून घरमालकाला मारहाण करून डोळ्यात मिरची पूड टाकली. घरातील महिलेच्या गळ्यातील दोन ...

संग्रहित छाया
मसूर : खोडजाईवाडी येथे दोन चोरट्यांनी घरात घुसून घरमालकाला मारहाण करून डोळ्यात मिरची पूड टाकली. घरातील महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
खोडजाईवाडी येथील राजाराम किसन मांडवे यांचे घर खोडजाईवाडी किवळ रस्त्यालगत गावापासून थोड्या अंतरावर तलावाजवळील टेकडावर आहे. रात्रीच्या सुमारास राजाराम मांडवे हे टीव्ही पाहत घरात बसले होते. त्यावेळी त्यांची पत्नी घरातील कामे करीत होती. तोंडाला रुमाल बांधून दोन चोरट्यांनी घरात अचानक प्रवेश केला.
त्यापैकी एका चोरट्याने टीव्ही पाहात असलेल्या मांडवे यांच्या कानाखाली मारून खुर्चीवरून खाली ढकलून दिले. त्याचवेळी दुसऱ्या चोरट्याने डोळ्यात मिरची पूड टाकून चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून क्षणात पोबारा केला. अचानकपणे झालेल्या घटनेने मांडवे भयभीत झाले होते.
३० ते ३५ वयोगटातील चोरटे
चोरटे साधारणत: मध्यम बांध्याचे व ३० ते ३५ वयोगटातील असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी अशाच प्रकारे मांडवे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला होता. परंतु, तो अयशस्वी झाला होता. धाडसी चोरीमुळे घरात महिला सुरक्षित नसल्याची चर्चा सुरू आहे. चोरट्यांचा पोलिसांनी ताबडतोब बंदोबस्त करावा. चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.