Satara: रुग्णाला भेटायला गेले, चोरट्यांनी बंद घर फोडून दागिन्यासह पूजेचे साहित्य लंपास केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:57 IST2025-08-25T17:56:38+5:302025-08-25T17:57:54+5:30
लोणंद शहरात चोरट्यांचा धुमाकूळ

संग्रहित छाया
सातारा : लोणंद शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि चांदीचे पूजेचे साहित्य लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील मंडळी नात्यातील आजारी रुग्णाला भेटण्यासाठी परगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून घरात प्रवेश केला. सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच पूजेतील चांदीचे साहित्य असा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
सकाळी परत आल्यावर घराची अवस्था पाहून घरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून, मुद्देमालाची अचूक किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही.
बंद घरे लक्ष्य
गेल्या काही दिवसांत लोणंद परिसरात घरफोड्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांची गस्त असूनही चोरट्यांनी उघडपणे बंद घरे टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे. ‘पोलिसांनी ठोस पावले उचलून चोरट्यांना धडा शिकवावा’ अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सुरक्षा साधनं वापरावीत
दीर्घकाळासाठी घर बंद ठेवायचे असल्यास शेजाऱ्यांना कळवावे. घराचे दरवाजे, खिडक्या मजबूत कुलूपबंद कराव्यात. सीसीटीव्ही व अलार्म सिस्टीमचा वापर करावा. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी केले आहे.