..त्यासाठी विरोधकांची एकजूट गरजेची, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले मत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:51 PM2023-11-17T12:51:30+5:302023-11-17T12:51:53+5:30

कऱ्हाड : ‘राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र ...

There is an anti BJP atmosphere in the country, but unity of the opposition is needed to take advantage of it says former Chief Minister prithviraj chavan | ..त्यासाठी विरोधकांची एकजूट गरजेची, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले मत 

..त्यासाठी विरोधकांची एकजूट गरजेची, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केले मत 

कऱ्हाड : ‘राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही. म्हणूनच जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजप वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करीत आहे. त्यांचा हा डाव खरंतर सर्वांनी ओळखला आहे. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे; पण त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्ताने फळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते.

चव्हाण म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यवहारिकदृष्ट्या योग्य होते; पण पुढे सरकारला ते टिकविता आले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित भेटून त्याची योग्य मांडणी केल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही, असेही चव्हाण यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर सांगितले.

त्यांचं घरातल्या घरात काय चाललंय समजत नाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीनिमित्त एकत्रित भेटले. याबाबत छेडले असता चव्हाण म्हणाले, ‘त्यांचं घरातल्या घरात नेमकं काय चाललंय? हे समजत नाही. आणि त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्लेषण करणारा अजून जन्मायचा आहे, असेही त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना मिश्कीलपणे सांगितले.

कोण कोणती जागा लढणार, हे निश्चित नाही

तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार का? याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, ‘अजून आमच्या आघाडीत कोण कोणती जागा लढवणार, हे निश्चित नाही. ते पहिल्यांदा ठरले पाहिजे. महाविकास आघाडीत जो निर्णय होईल, त्यावर पुढील दिशा ठरेल.’

ती त्यांची वैयक्तिक भूमिका..

काँग्रेसचे नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविषयी मांडलेल्या भूमिकेबाबत विचारले असता, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ती पक्षाची भूमिका नाही. पक्षाच्या बैठकीत आम्ही आमची मते मांडणार आहोत.’

Web Title: There is an anti BJP atmosphere in the country, but unity of the opposition is needed to take advantage of it says former Chief Minister prithviraj chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.