Pune-Bangalore Highway: उड्डाणपुलाशेजारी घोंगावतेय मृत्यूचे सावट, सुरक्षिततेचे उपाय नसल्याने अपघातांत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:24 IST2025-12-04T18:24:09+5:302025-12-04T18:24:31+5:30
जुन्या उड्डाणपुलांच्या रुंदीकरणाचे काम धोक्याचे

Pune-Bangalore Highway: उड्डाणपुलाशेजारी घोंगावतेय मृत्यूचे सावट, सुरक्षिततेचे उपाय नसल्याने अपघातांत वाढ
माणिक डोंगरे
मलकापूर : मलकापूर परिसरातील पुणे-बंगळुरू महामार्गाच्या जुन्या उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचे काम ठिकठिकाणी धोकादायक बनले आहे. याठिकाणी भक्कम सुरक्षितता नसल्यामुळे अपघातांत वाढ झाली आहे. रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाशेजारी क्षणाक्षणाला मृत्यू घोंगावत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराविरोधात वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सहापदरीकरण कामात शेंद्रे ते कागल हे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. या कामात ४१ ठिकाणी लहान अंडरपास, मलकापुरात १ तीन किलोमीटरचा युनिक उड्डाणपूल तर १ पादचारी पूल, ५३ ठिकाणी बॉक्स कलव्हर्ट, १०६ ठिकाणी पाईप कलव्हर्ट, ३० ठिकाणी स्लॅब कलव्हर्ट, १०५ ठिकाणी उपमार्ग कलव्हर्ट, वाठार, पाचवड, वारुंजी फाटा, पंढरपूर फाटा हे ४ ग्रेड जंक्शन, ३४ विविध ठिकाणी मायनर जंक्शन, २४ ठिकाणी बस स्टॉप, ९ ठिकाणी मोठे अंडरपास, ४ ठिकाणी लहान अंडरपास, २४ ठिकाणी उपमार्ग पूल होणार आहेत.
या सर्व ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने कामे सुरू केली आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी सुरक्षिततेबाबत पुरेशी व्यवस्था केलेली नसल्यामुळे महामार्गावर अपघातांत वाढ झाली आहे.
मंगळवारी सहलीच्या बसला झालेल्या अपघातात ५७ जण जखमी झाले. त्याच पद्धतीने काही दिवसांपूर्वी वाठार येथेच मालवाहतूक रिक्षा पुलावरून नदीत कोसळून अपघात झाला होता. तर वाठार ते टोल नाका परिसरात खोदलेल्या खड्ड्याला पुरेशी सुरक्षितता नसल्यामुळे अनेक अपघात होऊन २० जणांना आपला जीव गमवावा लागला तर १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
याबाबत अनेकवेळा आंदोलने करूनही महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. अशा ठिकाणी सुरक्षिततेबाबत पुरेशी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, सुरक्षिततेबाबत कोणतीही काळजी घेतली नसल्याने वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून कंत्राटदाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सात ठिकाणी भरावपुलांच्या रुंदीकरणाला ठोकळ्यांचा आधार
तासवडे ते पेठ नाका परिसरात प्रत्येक गावाच्या समोर सात ठिकाणी भरावपूल आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणासाठी या सातही भरावपुलांचे रुंदीकरण करावे लागणार आहे. हे रुंदीकरण करत असताना दोन्ही बाजूला भिंत बांधून मध्ये भराव घालण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, जुना भराव आणि नवीन भिंत याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सुमारे २० ते २५ फुटाचे खड्डे आहेत. याठिकाणी एकेरी वाहतुकीत केवळ ठोकळ्यांचा आधार ठेवलेला आहे. या खड्ड्यांना सुरक्षिततेची कोणतेही प्रभावी उपाययोजना केलेली नाही.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती
वाठार (ता. कराड) येथे सहलीच्या बसला झालेल्या अपघाताची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने दखल घेतली. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदाराच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन, महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत जाब विचारला. संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांची चांगलीच झाडझडती घेतली, याची मलकापुरात महामार्गाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.