Satara Crime: चोरी पकडली; मस्तक फिरलं, रिटायर्ड फौजीच्या हातून भलंतच घडलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:54 IST2025-11-17T16:51:34+5:302025-11-17T16:54:12+5:30
पोलिसांच्या डोळ्यात डोळे घालून तो वेगवेगळ्या घटना पोलिसांना सांगत होता. परंतु, पोलिसांनी अत्यंत काैशल्याने त्याला बोलतं केलं

Satara Crime: चोरी पकडली; मस्तक फिरलं, रिटायर्ड फौजीच्या हातून भलंतच घडलं!
सातारा : घरात कोणी नसताना शेतमजुरानं कपाटं उघडलं. त्याच्या हाताला २२ हजारांची रोकड लागली. याचवेळी रिटायर्ड फाैजीने घरात प्रवेश केला. मजुराने चोरी केल्याचे पाहून फाैजीचं मस्तक फिरलं. घरातल्या धारदार शस्त्राने त्याचा खून केला. एवढ्यावरच न थांबता शेतमजुराचा मृतदेह जाळून विहिरीतही फेकला. पण, पोलिसांच्या काैशल्यामुळे सहा महिन्यानंतर फाैजीच्या कृत्याचा भांडाफोड झाला.
सातारा तालुक्यातील निनाम पाडळीतील शेतमजूर संभाजी शेलार (वय ४३) हे घरातून काहीएक न सांगता निघून गेल्याची तक्रार त्यांच्या बहिणीने जून महिन्यात बोरगाव पाेलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी मिसिंग म्हणून हे प्रकरण नोंदवून घेतलं. संभाजी शेलार यांना शेवटचे कोणासोबत पाहिले हाेतं, याची माहिती पोलिस घेत होते. तेव्हा माजी सैनिक भरत ढाणे याचे नाव समोर आले.
बोरगाव पोलिसांनी त्याला चाैकशीसाठी बोलावलं. पण, त्यानं म्हणे, संभाजी मला भेटून कोठे निघून गेला, हे मलाही माहिती नाही, असं उत्तर दिलं. पोलिसांनी त्याची जुजबी चाैकशी केल्यानंतर त्याने सुटकेचा निश्वास सोडला. परंतु, सहा महिन्यानंतर शेतमजुराच्या मिसिंग प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले. रिटायर्ड फाैजी भरत ढाणे यानेच शेतमजुराचा खून केल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाली.
त्यानंतर त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, राेहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करून तपासाला पाठवले. या पथकाने भरत ढाणेला चाैकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याची चाैकशी सुरू केली. परंतु, तो मी नव्हेच, अशा अविर्भावात तो पोलिसांच्या प्रत्येक प्रश्नाला धडधडीतपणे उत्तरे देऊ लागला.
पोलिसांच्या डोळ्यात डोळे घालून तो वेगवेगळ्या घटना पोलिसांना सांगत होता. परंतु, पोलिसांनी अत्यंत काैशल्याने त्याला बोलतं केलं. संभाजी शेलारला शेवटंच भेटणारा तूच आहेस. याचा प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आमच्याकडे आहे, असं म्हणताच भरत ढाणेने आपला गुन्हा कबूल केला. त्याची चोरी पकडल्यानं माझं मस्तक फिरलं. रागाच्या भरात त्याला संपवून टाकलं, अशी धक्कादायक माहिती त्यानं पोलिसांजवळ दिली.
सन्मान ‘त्यानं’ क्षणात लयाला लावला
शेतमजुराने चोरी केल्याचे पकडल्यानंतर रिटायर्ड फाैजीने त्याला पोलिसांच्या ताब्यात देणे गरजेचे होते. मात्र, कायदा हातात घेऊन त्याने स्वत:च्या आणि शेतमजुराच्या कुटुंबाचीही वाताहात लावली. एवढेच नव्हे तर देशसेवा करून मिळवलेला सन्मान त्यानं क्षणात लयाला लावला.