TET paper leak case: प्रयत्न कोल्हापुरात; खळबळ कराडात!, ‘महेश’च्या लाईफस्टाइलची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:42 IST2025-11-25T15:41:55+5:302025-11-25T15:42:18+5:30
सूत्रधार कराडचा, एक सेवानिवृत्त जवान

TET paper leak case: प्रयत्न कोल्हापुरात; खळबळ कराडात!, ‘महेश’च्या लाईफस्टाइलची चर्चा
कराड : कोल्हापुरात रविवारी टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला; पण पर्दाफाश केलेल्या या रॅकेटचे सूत्रधार कराड तालुक्यातील बेलवाडी गावच्या जय हनुमान करिअर अकॅडमीचे दोन संचालक असल्याचे समोर आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात विविध केंद्रांवर रविवार, दि. २३ रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. मात्र, आदल्या दिवशीच पेपर फोडण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापूर एलसीबी आणि मुरगूड पोलिसांनी संयुक्त कारवाईद्वारे या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांच्या पथकांनी मुरगूड-निपाणी रस्त्यावर सोनगे (ता. कागल) येथील एका मॉलवर मध्यरात्री छापा टाकून या रॅकेटमधील १० जणांना ताब्यात घेतले. त्यामध्ये चार शिक्षकांचा समावेश आहे. पण, या रॅकेटचा सूत्रधार कराड तालुक्यातील अन् शिक्षण क्षेत्राशी निगडित असल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
यातील मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (रा. बेलवाडी, ता. कराड) हा सध्या फरार असून, त्याचा भाऊ संदीप गायकवाड हा अटकेत आहे. तो सेवानिवृत्त जवान आहे. बेलवाडी गावात त्यांची जय हनुमान करिअर अकॅडमी आहे. त्याठिकाणी मुले भरती पूर्व प्रशिक्षण घेतात. हे दोन्ही भाऊ अकॅडमीचे संचालक आहेत. त्यांचा थोरला भाऊ प्रमोद गायकवाड हा अकॅडमीचे व्यवस्थापन सांभाळतो. यावर्षी त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयही सुरू केले असून, तेथे विद्यार्थ्यांची निवासी सोय करण्यात आली आहे.
करिअर घडविणाऱ्यांचेच करिअर अडचणीत!
जय हनुमान करिअर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्याचे काम येथे केले जात होते; पण दोन संचालक बंधूंच्या प्रतापामुळे संपूर्ण कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचबरोबर एक भाऊ प्रमोद गायकवाड हा आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मसूर जिल्हा परिषद गटातून राजकीय करिअर करण्याच्या तयारीत होता; पण आता त्याचे करिअरच अडचणीत आल्याची चर्चा आहे.
‘महेश’च्या लाईफस्टाइलची चर्चा
महेश गायकवाड हा मसूर परिसरात नेहमीच वावरायचा. त्याच्याबाबत अधिक माहिती घेतल्यावर त्याच्या लाईफस्टाइलची परिसरात चर्चा ऐकायला मिळते. तो अंगावर भरपूर सोने घालून फिरतो. तसे फोटोही पाहायला मिळतात. तोच पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॅकेटचा सूत्रधार निघाला आहे. या रॅकेटने यापूर्वीही पेपर फोडले आहेत का? हे तपासात निष्पन्न होईल.