Satara: चारित्र्यावरुन संशय; डोक्यात घण घालून पत्नीचा खून, पतीने संपविले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 15:49 IST2025-10-09T15:47:45+5:302025-10-09T15:49:20+5:30
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील हिंगणी येथील आसळओढा येथील एकाने चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात लोखंडी घन घालून खून ...

Satara: चारित्र्यावरुन संशय; डोक्यात घण घालून पत्नीचा खून, पतीने संपविले जीवन
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील हिंगणी येथील आसळओढा येथील एकाने चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात लोखंडी घन घालून खून केला. त्यानंतर स्वत: विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.
अनिता बंडू घुटुगडे (वय ३२ रा. मायणी, ता. माण) असे खून झालेल्या महिलेचे नाव तर बंडू अंकुश घुटुगडे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बंडू अंकुश घुटुगडे याने चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी अनिता हिच्या डोक्यात लोखंडी घन मारून गंभीर जखमी करून तिचा खून केला. तसेच स्वतः विषारी औषध प्राशन करून रबरी पट्ट्याच्या साह्याने पत्र्याच्या शेडच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची नोंद म्हसवड पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत मृत अनिताचा भाऊ ज्ञानेश्वर झिमल (रा. गंगोती) याने म्हसवड पोलिसांत तक्रार दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच दहिवडी उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत तसेच म्हसवड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत दोन्हीही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दहिवडी येथे पाठविण्यात आले आहेत.
दोन्ही मुले झाली पोरकी
अनिता घुटूकडे व बंडू घुटूकडे या दापत्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दापत्याला दोन मुले असून मुलगी चौथीत तर मुलगा सहावीत शिकत आहे. ही दोन्ही मुले आता पोरकी झाली आहेत. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्यावर मानसिक आघात झाला आहे. आता या दोन्ही मुलांचा सांभाळ, आईचे नातेवाईक की वडिलांचे नातेवाईक करणार, याबाबत आता पोलिस निर्णय घेणार आहेत.