सापाला वाचविण्यासाठी वेग केला कमी, दुचाकीला टेम्पोची धडक; तिघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:26 IST2019-05-03T12:12:20+5:302019-05-03T12:26:28+5:30
रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला वाचविण्यासाठी दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात निवती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप गोसावी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले. जखमींना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास माड्याचीवाडी येथे घडला.

सापाला वाचविण्यासाठी वेग केला कमी, दुचाकीला टेम्पोची धडक; तिघे गंभीर
कुडाळ : रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला वाचविण्यासाठी दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात निवती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रदीप गोसावी यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले.
जखमींना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास माड्याचीवाडी येथे घडला.
प्रदीप गोसावी हे गेल्या वर्षीपासून निवती पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. मंगळवारी सायंकाळी ते कुडाळहून निवती पोलीस ठाणे येथे दुचाकीने जात होते. त्यांच्याबरोबर पत्नी प्रेरणा व मुलगी जुई होती. माड्याचीवाडी हायस्कूल येथे रस्त्यावरून जाणाऱ्या सापाला वाचविण्यासाठी त्यांनी ब्रेक लावून दुचाकीचा वेग कमी केला.
या दरम्यान मागून आईस्क्रीम भरून जात असलेल्या टेम्पोची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली. त्यामुळे प्रदीप गोसावी रस्त्यावर फेकले गेल तर त्यांची पत्नी व मुलगी दुचाकीबरोबर काही अंतर फरफटत गेले. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.
स्थानिक ग्रामस्थांनी सर्व जखमींना तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रेरणा यांच्या डोक्याला व मानेला, जुईच्या हाताला, तर प्रदीप यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. या अपघात प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.
गोसावी कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी गर्दी
प्रदीप गोसावी यांना अपघात झाल्याचे वृत्त समजताच कुडाळ व निवती पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी गोसावी कुटुंबीयांची विचारपूस केली. तसेच अपघातस्थळाची पाहणी केली.