Satara: शहीद विकास गावडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, खराब हवामानामुळे पार्थिव आणण्यासाठी झाला विलंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:32 IST2026-01-13T13:31:54+5:302026-01-13T13:32:13+5:30
कुटुंबावर शोककळा तरीही अभिमान, पाच दिवसांनी दिली माहिती

Satara: शहीद विकास गावडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, खराब हवामानामुळे पार्थिव आणण्यासाठी झाला विलंब
फलटण : फलटण तालुक्यातील बरड येथील शहीद विकास गावडे यांना सुदान येथे शांती सैनिक म्हणून कार्यरत असताना वीरमरण आले होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बरड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी फलटण तालुक्यातून हजारो नागरिक अभिवादन करण्यासाठी आले होते. बरड येथील पालखीतळावर त्यांना मानवंदना देऊन अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, अनिकेतराजे नाईक-निंबाळकर यांनी अभिवादन केले.
शहीद विकास गावडे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून आजी-माजी सैनिक आले होते. बरड गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा महिलांनी व नागरिकांनी गर्दी केली होती. संपूर्ण गावात रांगोळी काढून ‘शहीद जवान अमर रहे’ अशी घोषवाक्य लिहिली होती.
शहीद जवान विकास विठ्ठलराव गावडे हे दहा वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात सामील झाले होते. त्यांनी जम्मू-काश्मीर येथे लेह, लडाख या ठिकाणी तीन वर्षे, मध्य प्रदेश तसेच राजस्थान येथे तीन वर्षे सेवा केली. सध्या ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिसेनेच्या मोहिमेवर सुदान देशात सेवा बजावत होते.
कुटुंबावर शोककळा तरीही अभिमान
शहीद जवान विकास गावडे यांचे गौरी यांच्याशी २०२२ मध्ये लग्न झाले होते. पती सैन्य दलात असल्याचा गौरी व कुटुंबीयांना अभिमान होता. शहीद विकास यांना दोन वर्षांची मुलगी श्रीशा आहे. तिचा वाढदिवस दोन दिवसांवर आला होता. १४ जानेवारीला शहीद विकास घरी येणार होते; मात्र त्या आधीच त्यांना सुदान येथे वीरमरण आले.
कुटुंबीयांना पाच दिवसांनी दिली माहिती
शहीद जवान विकास गावडे यांना सुदान येथे बुधवार, दि. ७ रोजीच वीरगती प्राप्त झाली होती. तेव्हापासून गावकऱ्यांनी व भावकीतील सदस्यांनी ही माहिती शहीद विकास यांच्या कुटुंबीयांना दिली नाही. लष्कराच्या अधिकऱ्यांनी कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली.
खराब हवामानामुळे उशीर..
सुदान येथे शांतिदूत म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमेत सामील असलेले शहीद विकास गावडे यांना मागील आठवड्यातच वीरमरण प्राप्त झाले होते; परंतु सुदान येथील हवामान अनेक दिवस खराब असल्यामुळे पार्थिव मायदेशात आणण्यासाठी विलंब झाला.
बंधू होणार सैन्यात दाखल
शहीद विकास यांना काही दिवस अगोदरच त्यांच्या धाकटे बंधूना सैन्यदलातील नोकरी मिळाली असल्याचे त्यांच्या मित्रांनी सांगितले; बंधू विकास यांना वीरगती प्राप्त झाल्यावरही त्यांचे बंधू सैन्य दलात सामील होणार आहेत.