Satara ZP Election Results 2026: कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचे जोरदार कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:18 IST2026-02-10T18:15:49+5:302026-02-10T18:18:06+5:30
खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर व मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र येत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी रणनीती आखली

संग्रहित छाया
साहिल शहा
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. जिल्हा परिषदेच्या सहापैकी तीन जागा जिंकत तर पंचायत समितीमध्ये बारापैकी तब्बल नऊ जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्याच्या राजकारणात ठळक मुसंडी मारली आहे. २०१९ नंतर महायुतीकडे झुकलेला कोरेगाव तालुका पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे वळल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विचारांना मतदारांनी विजयाच्या रूपाने मान्यता दिली आहे.
दक्षिण-उत्तर सुमारे ऐंशी किलोमीटरपर्यंत विस्तारलेल्या कोरेगाव तालुका हा कोरेगाव-कराड उत्तर व फलटण-कोरेगाव असे तीन विधानसभा मतदारसंघ आणि सातारा व माढा लोकसभा मतदारसंघामध्येही विभागलेला आहे. त्यामुळे दोन खासदार व चार आमदारांचे राजकीय वर्चस्व या तालुक्यावर कायम राहिले आहे. जरंडेश्वर शुगर मिल्सच्या माध्यमातून अजितदादा पवार यांनी तालुक्यात लक्ष घातल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद वाढली होती, मात्र २०१९ नंतर चित्र बदलले होते. २०२४ मध्ये महायुतीने सातारा लोकसभा तसेच कोरेगाव व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला होता, तर माढा लोकसभा व फलटण-कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रतिनिधी विजयी झाले होते.
या निवडणुकीत पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी मोठी बांधणी केली होती. त्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार मनोज घोरपडे यांची साथ मिळाली. दुसरीकडे खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर व मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र येत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी रणनीती आखली. किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यामुळे पाटील बंधूंचे राजकीय वजन या निवडणुकीत निर्णायक ठरले.
पिंपोडे बुद्रुक गटात फेरमतमोजणीनंतर भाजपचे अमित चव्हाण विजयी ठरले, कुमठे गटात देखील शिवसेनेचे हणमंतराव जगदाळे विजयी झाले. तर वाठार स्टेशन गटात राष्ट्रवादीच्या जयश्री भोसले यांनी यश मिळवले. एकंबे व वाठार किरोली गटातही राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचा सर्वाधिक फटका भाजप व शिंदेसेनेला बसल्याचे चित्र आहे.
एकाही मोठ्या नेत्याची जाहीर सभा न होता देखील राष्ट्रवादीने मिळवलेला हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे खासदार नितीन पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याने आगामी राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.