Satara: शाळकरी मुलीच्या खून प्रकरणी संशयित आरोपीची कसून चौकशी, आणखी एका खुनाचा उलगडा होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 15:42 IST2025-10-13T15:42:48+5:302025-10-13T15:42:58+5:30
न्यायालयाकडून ‘त्याला’ सात दिवस पोलिस कोठडी

Satara: शाळकरी मुलीच्या खून प्रकरणी संशयित आरोपीची कसून चौकशी, आणखी एका खुनाचा उलगडा होणार!
सातारा : एका १३ वर्षांच्या शाळकरी मुलीच्या खुनात अटक केलेल्या संशयित आरोपीकडून आणखी एका खुनाचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून आरोपीची कसून चाैकशी सुरू असून न्यायालयाने त्याला सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
सातारा तालुक्यातील एका गावात शुक्रवार, दि. १० रोजी एका १३ वर्षांच्या मुलीचा खून करण्यात आला. या खूनप्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राहुल यादव या चाैतीस वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून पोलिसांनी या खूनप्रकरणाचा उलगडा केला. परंतु मागील नऊ महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणात बोरगाव पोलिसांनी त्याला चाैकशीसाठी ताब्यात घेतले होते.
मात्र, इथेही त्याने ‘तो मी नव्हेच’ असे सांगून तसे पुरावेही पोलिसांसमोर सादर केले. त्यामुळे म्हणे, पोलिसांना त्याच्यावर कारवाई करता आली नाही. परंतु आता या मुलीच्या खूनप्रकरणामुळे त्याच्यावरील संशय अधिक बळावला आहे. येत्या काही दिवसांत विहिरीत मृतदेह सापडलेल्या मुलीच्याही मृत्यूचे गूढ उलगडेल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीला बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर हे करीत आहेत.
‘पोक्सो’च्या कलमाची वाढ
राहुल यादव याच्यावर शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, संबंधित मुलगी अल्पवयीन असल्यामुळे पोक्सोच्या (बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण) कलमाची वाढ करण्यात आली आहे.