Satara Crime: तब्बल २०० सीसीटीव्ही अन् ‘ते’ ७२ तास!, शिक्रापूर एन्काउंटरची इनसाईड स्टोरी.. वाचा सविस्तर
By दत्ता यादव | Updated: September 1, 2025 16:17 IST2025-09-01T16:16:43+5:302025-09-01T16:17:38+5:30
पाणी पिलं अन् ‘त्यानं’ कॅमेराकडे बघितलं

Satara Crime: तब्बल २०० सीसीटीव्ही अन् ‘ते’ ७२ तास!, शिक्रापूर एन्काउंटरची इनसाईड स्टोरी.. वाचा सविस्तर
दत्ता यादव
सातारा : साताऱ्यात कधी नव्हे ते भलतंच घडलं होतं. गुन्हेगारीचं अक्राळ-विक्राळ स्वरूप कोयता गँगच्या निमित्तानं अवघ्या आठवड्यात सीसीटीव्हीमुळे समोर आलं. हे पाहून सातारकरांचेच नव्हेतर, पोलिसांचंही रक्त सळसळलं. आधी पुरावे मग कारवाई या युक्तीप्रमाणे पोलिसांनी शोधमोहीम राबविली. दोनशे सीसीटीव्ही, सव्वाशे पोलिस आणि ७२ तासांत पोलिसांनी जे केलं ते अत्यंत थरारक अन् रोमांच आणणारं होतं.
कोयता गँगनं ज्या पद्धतीने महिलेचा पाठलाग केला ते पाहून पोलिसांना सुरुवातीला वाटलं हे आरोपी प्रतापसिंहनगरातील असू शकतात. त्यादृष्टीने पोलिसांनी सुरुवातीला तपास सुरू केला. परंतु, जसजसा तपासात क्लू मिळू लागला तस तसं गुन्ह्याचं गांभीर्य पोलिसांच्या लक्षात आलं. तब्बल सव्वाशेहून अधिक पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. सुरुवातीला सर्व भर सीसीटीव्हीवर दिला.
आरोपी ज्या रस्त्याने आले तेथील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात पोलिसांच्या पथकानं सुरुवात केली. प्रत्येक सीसीटीव्हीत चोरटे कैद झाल्याचं दिसत होतं. परंतु, त्यांचे चेहरे मात्र झाकलेले होते. दुचाकीचा नंबर मिळाला. परंतु, तो बोगस असल्याचं समोर आलं. जोपर्यंत ते चेहरे उघड होत नाहीत तोपर्यंत ठोस माहिती हाती लागणं शक्य नव्हतं. हे जाणून असलेल्या पोलिसांनी आरोपींनी ज्या मार्गावरून पलायन केलं तेथील ३५ किलोमीटरपर्यंतचे तब्बल दोनशेहून अधिक सीसीटीव्ही तपासले तेव्हा एका सीसीटीव्हीनं या गुन्ह्याची पोलखोल केली.
‘हाच’ कटाक्ष पुढे एन्काऊंटरपर्यंत पोहोचला
कोयता गँगमधील तिघे आरोपी महामार्गावरून वाढे फाटामार्गे लोणंदकडे गेले. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या तिघांपैकी लखन भोसले याने पाणी पिण्यासाठी तोंडाचं काळं कापड काढलं. तोंड वर करून पाणी पिताना त्यानं तेथील सीसीटीव्हीकडेही एक कटाक्ष टाकला. हाच कटाक्ष पुढे त्याच्या एन्काऊंटरपर्यंत पोहोचला.
आरोपींकडे मोबाइल नव्हता
मोबाइल लोकेशनवरून पोलिस शोध घेतात, हे कोयता गँगमधील आरोपी जाणून होते. त्यामुळे त्यांनी मोबाइलचा वापर केला नाही. त्यामुळे पोलिसांना रस्त्यावरील सीसीटीव्हीवरच भरवसा ठेवावा लागला.
असं झालं एन्काऊंटर!
- सीसीटीव्हीत लखन भोसले याचा चेहरा स्पष्ट दिसल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईक व त्याला जवळून ओळखणाऱ्यांना तो कुठे जाऊ शकतो, याची माहिती विचारली. त्यानंतर एका साथीदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
- पुण्यातील शिक्रापूर येथे त्यांच्या ओळखीच्या मित्राकडे ते गुन्हा केल्यानंतर जातात, हे समजले आणि पोलिसांचे पथक शिक्रापूरला गेले.
- सहायक पोलिस निरीक्षक श्याम काळे, हवालदार सुजित भोसले, तुषार भोसले यांनी त्यांची कार आरोपींच्या घरापासून काही अंतरावर उभी केली. सायंकाळी सातची वेळ. सर्वजण चालत दबक्या पावलाने घराजवळ पोहोचले. पोलिस आल्याचे पाहताच एक आरोपी ओरडला. लखन भोसले काय झालं म्हणून उठून पोलिसांकडे पाहात होता. हवालदार सुजित भोसले यांनी त्याचा हात पकडला. याचवेळी लखन याने खिशातून चाकू काढून त्यांच्या हातावर मारला. त्यामुळे त्यांचा हात निसटला. हवालदार तुषार भोसले यांच्याशी त्याची झटापट सुरू होती. चाकू घेऊन तो वार करत होता. याचवेळी त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. अन् कोयता गँगची दहशत अखेर पोलिसांनी संपुष्टात आणली.