श्रीनगरमधील गलाई बांधव सुखरूप

By Admin | Updated: September 15, 2014 00:12 IST2014-09-14T21:36:13+5:302014-09-15T00:12:46+5:30

पाणी पातळीत घट : पावसास पुन्हा सुरूवात झाल्याने चिंता वाढली

Sailor of Golai in Srinagar | श्रीनगरमधील गलाई बांधव सुखरूप

श्रीनगरमधील गलाई बांधव सुखरूप

विटा : जम्मू-काश्मीर येथील झेलम नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकून पडलेले सोने-चांदी गलाई व्यावसायिक सुखरूप असल्याची माहिती आज, रविवारी जम्मू येथील गलाई व्यावसायिक सनी शिंदे यांनी दिली. सध्या पुराचे पाणी ओसरू लागले असले तरी, आज, रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाल्याने चिंता वाढली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये झेलम नदीला गेल्या आठ ते नऊ दिवसांपासून पूर आला आहे. सोने-चांदी गलाई व्यवसायासाठी खानापूर, कडेगाव, आटपाडी, तासगावसह खटाव व माण तालुक्यातील मराठी बांधव तेथे स्थायिक झाले आहेत. श्रीनगरमधील लाल चौक, कुकर बझार, महाराजा बझार, जैनाकधर आदीसह अन्य भागातही गलाई बांधव पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
आज, रविवारी जम्मू येथील मराठी बांधव सनी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, श्रीनगर येथील कुकर बझार, महाराजा बझार, लाल चौक आदी भागात असलेल्या नातेवाईकांचा शनिवारी सायंकाळी संपर्क झाला. त्यावेळी ते सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, जैनाकधर परिसरातील गलाई बांधवांचा अद्यापही संपर्क होत नाही. आता पुराचे पाणी ओसरू लागले आहे. सध्या त्या भागात दोन ते अडीच फूट पाणी पातळी आहे. त्यामुळे पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. मात्र, आज, रविवारी पहाटेपासून परिसरात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने चिंंता वाढली आहे. (वार्ताहर)

दोनशेला पाण्याची बाटली
श्रीनगर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी व त्यांना पाणी, अन्न पुरविण्यासाठी लष्कराचे जवान प्रयत्न करीत आहेत. मात्र, लष्कराकडून मिळालेली पिण्याच्या पाण्याची एक बाटली २०० रुपयांना विकण्याचा प्रकार काश्मीरमधील स्थानिक लोकांकडून सुरू असल्याची धक्कादायक माहितीही सनी शिंदे यांनी यावेळी दूरध्वनीवरून बोलताना सांगितली.

Web Title: Sailor of Golai in Srinagar