जादा परताव्याचे आमिष; साताऱ्यातील सेवानिवृत्त व्यक्तीची ६१ लाखांची ऑनलाईन फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 13:37 IST2026-01-13T13:36:54+5:302026-01-13T13:37:08+5:30
विशेष म्हणजे, गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा नफा मोबाइल स्क्रीनवर दिसत असल्याने त्यांचा संबंधितांवर विश्वास बसला. मात्र..

जादा परताव्याचे आमिष; साताऱ्यातील सेवानिवृत्त व्यक्तीची ६१ लाखांची ऑनलाईन फसवणूक
सातारा : जादा परताव्याचे आमिष दाखवून साताऱ्यातील एका सेवानिवृत्त व्यक्तीची तब्बल ६१ लाख २५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावेद मेहबूब शेख (वय ५७, रा. बापुजी साळुंखे नगर, विलासपूर, सातारा) हे सेवानिवृत्त आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक संशयास्पद लिंक आली. ही लिंक ओपन केल्यानंतर गुंतवणुकीतून जादा परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने त्यांना ‘मुनोथ इनसाई क्लब मुनोथ’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केले.
या ग्रुपच्या माध्यमातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यानुसार जुलै २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत त्यांनी वेळोवेळी एकूण ६१ लाख २५ हजार रुपये गुंतवले. विशेष म्हणजे, गुंतवलेली रक्कम आणि त्यावर मिळणारा नफा मोबाइल स्क्रीनवर दिसत असल्याने त्यांचा संबंधितांवर विश्वास बसला.
मात्र, जेव्हा त्यांनी गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पैसे मिळाले नाहीत. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अरविंद गवळी हे करत आहेत.