Satara: पट्टीच्या पोहणाऱ्याचा तरुणाचा नीरा नदीत बुडून मृत्यू, मित्रांसोबत आला होता फिरायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:14 IST2026-01-10T16:13:40+5:302026-01-10T16:14:52+5:30
तब्बल तीस तासांनंतर मृतदेह लागला हाती

Satara: पट्टीच्या पोहणाऱ्याचा तरुणाचा नीरा नदीत बुडून मृत्यू, मित्रांसोबत आला होता फिरायला
शिरवळ : पट्टीचा पोहता येणाऱ्या तरुणाचा खंडाळा तालुक्यातील तोंडल हद्दीत वीर धरण परिसरातील नीरा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. विनोद सुरेश गेंदे (वय ३४, मूळ रा. विठ्ठलवाडी-मुळशी, सध्या रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कोथरूड, पुणे परिसरातील विनोद गेंदे हे मित्र सुरक्षारक्षक रायभान श्रीराम पाटेकर (वय ४८), अर्जुन आबू सणस (४३, दोघे रा. कोथरूड, पुणे) यांच्यासमवेत वीर धरण परिसरात असणाऱ्या हाॅटेलमध्ये जेवणासाठी रिक्षामधून बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आले. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर नीरा नदीपात्राकडे जात विनोद गेंदे व रायभान पाटेकर हे नदीपात्रात उतरले. रायभान पाटेकर हे पोहता येत नसल्याने पाण्यात लांब गेले नाही, तर अर्जुन सणस हे पाण्यात उतरले नाही. विनोद गेंदे याला पोहता येत असल्याने नदीपात्रात लांब गेला.
विनोद गेंदे याला पाण्याचा अंदाज न आल्याने अचानकपणे पाण्याच्या प्रवाहात पाण्यात बुडाला. रायभान पाटेकर व अर्जुन सणस यांनी शिरवळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तब्बल तीस तासांनंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान विनोद गेंदे याचा मृतदेह शोधण्यात आला.
चौघांचे जीव वाचविले होते...
विनोद गेंदे हा पट्टीचा पोहणारा असल्याने त्याने खडकवासला-एनडीए मार्गावरील कालव्यामध्ये बुडणाऱ्या तीन जणांना आणि स्वारगेट येथील सेव्हन लव्ह चौक येथील कालव्यात बुडणाऱ्या एकाचा जीव वाचविला होता. मात्र, विनोद गेंदे याचाच पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.