Satara: मलकापुरातील लॉजवर पोलिसांचा छापा; चार पीडित महिलांची सुटका, एजंटासह तिघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:08 IST2026-01-07T17:07:42+5:302026-01-07T17:08:15+5:30
मलकापूर : येथील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली. संबंधित महिलांना देहविक्री व्यवसाय करण्यास भाग ...

संग्रहित छाया
मलकापूर : येथील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली. संबंधित महिलांना देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एजंटासह तिघांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली.
एजंट सुरज बाळासाहेब सोनवणे (वय ४०, रा. आगाशिवनगर, ता. कराड), अमोल अनिल देसाई (३४, रा. नाचणे गोडावून थांबा, रत्नागिरी) व रामा आनंदा सकट (४६, रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर, ता. कराड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथे शास्त्रीनगरमध्ये असलेल्या एका लॉजमध्ये काही महिलांना देहविक्री व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने लॉजवर छापा टाकला. त्यावेळी चार पीडित महिला त्याठिकाणी आढळून आल्या.
एजंट सुरज सोनवणे, रुमबॉय अमोल देसाई व रामा सकट हे तिघेजण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना देहविक्री करण्यास भाग पाडत होते. संबंधित महिलांच्या गरिबीचा व असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन ते हे कृत्य करीत होते. त्यामुळे त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडून रोकड व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार तपास करीत आहेत.