आंदोलक पुढे येऊ लागले, पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले; साताऱ्यात उडाली खळबळ, मात्र..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 16:51 IST2025-09-02T16:40:14+5:302025-09-02T16:51:41+5:30
सातारा : राजवाडा बसस्थानकात घोषणा देत आंदोलक पुढे येऊ लागले. हे पाहून पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडून जमाव पांगविला. हे ...

छाया : जावेद खान
सातारा : राजवाडा बसस्थानकात घोषणा देत आंदोलक पुढे येऊ लागले. हे पाहून पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडून जमाव पांगविला. हे खरोखरचं आंदोलन नसून, पोलिसांनी प्रात्यक्षिक केल्याचे समजल्यानंतर बघ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी म्हणून पोलिसांनी शहरात रुट मार्च आणि दंगा नियंत्रणाचा सराव केला. मात्र, या सरावावेळी राजवाडा बसस्थानक परिसरात खळबळ उडाली.
पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलिस, शाहूपुरी पोलिस, वाहतूक शाखा आणि होमगार्ड राजवाडा बसस्थानकात सोमवारी दुपारी साडेबारा वाजता दाखल झाले. सरावासाठी पोलिसांनी तेथील नागरिकांना आंदोलकांची भूमिका निभावण्याची विनंती केली. सुरुवातीला कोणीही तयार नव्हते; मात्र ‘माध्यमामध्ये फोटो येतील’ या गंमतीमुळे काही नागरिक घोषणाबाजीसाठी पुढे सरसावले.
सरावादरम्यान अग्निशामक दलाच्या बंबातून पाण्याचा फवारा मारण्यात आला आणि लगेचच अश्रुधुराचे नळकांडे फोडण्यात आले. अचानक पसरलेल्या धुरामुळे आंदोलकांच्या डोळ्यांत पाणी आले, चेहऱ्यावर जळजळ झाली. पोलिसांची आंदोलकांवरील कारवाई नेमकी कशी असते, याचा प्रत्यय या प्रात्यक्षिकात सहभागी झालेल्या नागरिकाला आला.
दरम्यान, या प्रात्यक्षिकानंतर रुट मार्च काढण्यात आला. हा रुट मार्च गोलबाग, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेट्ये चौक, पाचशे एक पाटी मार्गे पुन्हा राजवाडा बसस्थानकापर्यंत काढण्यात आला.