Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:40 IST2025-10-27T15:36:11+5:302025-10-27T15:40:36+5:30
Phaltan Doctor News in Marathi: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या तपासातून सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला प्रशांत बनकर आणि डॉक्टर तरुणी हे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्यात वादही झाले, पण प्रशांत आजारी पडला आणि दोघेही पुन्हा एकत्र आले होते.

Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
Phaltan Doctor Death in Marathi: डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत दोन जणांना अटक झाली आहे. पहिला आरोपी प्रशांत बनकर आहे, तर दुसरा निलंबित पीएसआय गोपाळ बदने आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, मयत डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर हे रिलेशनशिपमध्ये होते. काही महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे प्रशांत तिला टाळू लागला होता. दोघांमध्ये अनेकवेळा कॉल्स झाले आहेत. व्हॉट्सअप मेसेजही आहेत, जे पोलिसांनी मिळवले आहेत.
हिंदुस्थान टाइम्सने पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे रिपोर्ट प्रसिद्ध केला असून, त्यात मयत डॉक्टर तरुणी आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला प्रशांत बनकर यांचे प्रेमसंबंध होते.
दोघांमध्ये वाद, प्रशांत डॉक्टर तरुणीला टाळू लागला
प्रशांत बनकर डॉक्टर तरुणीच्या रुममालकाचा मुलगा आहे. मयत डॉक्टर तरुणी प्रशांत बनकरच्या घरीच वरच्या मजल्यावर असलेल्या घरात भाडेकरून म्हणून राहत होती. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. काही आठवड्यांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले होते, असे पोलिसांनी तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले.
तपास पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'त्यांच्यात दुरावा आला होता. पण, गेल्या महिन्यात प्रशांत बनकरला डेंग्यू झाला. त्यानंतर दोघांमधील प्रेमसंबंध पुन्हा वाढले.' प्रशांतच्या बहिणीने सांगितले की, 'ज्या दिवशी डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली, त्याच्या एक दिवस अगोदर तिने प्रशांत बनकर अनेक कॉल्स केले होते. त्यांच्या दोघांमधील कॉल्स आणि मेसेजेचे स्क्रीनशॉट पोलिसांकडे देण्यात आले आहेत.'
डॉक्टर तरुणी प्रशांत बनकरबद्दल खूप सीरियस झाली होती
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चॅट्स आणि कॉल्स रेकॉर्डमधून हे उघड झाले आहे की, मयत डॉक्टर तरुणी प्रशांत बनकरबद्दल पझेसिव्ह झाली होती. बनकरने तिला दूर करण्याचा प्रयत्न सुरू केले, तेव्हा त्यांच्यात वाद सुरू झाले होते.
जानेवारीपासून त्या दोघांमध्ये १५० पेक्षा जास्त कॉल्स झाले आहेत. प्रशांत बनकर डॉक्टर तरुणीला टाळू लागल्यानंतर त्याच्या वडिलाने या प्रकरणात निलंबित पीएसआय गोपाळ बदने याची मदत घेतली होती, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लग्न करण्यासाठी प्रपोज केले
आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीने सांगितलं की, फलटणवरून तो पुण्याला गेला तेव्हा मयत डॉक्टर तरुणीने त्याला लग्नासाठी प्रपोज केले. त्याने तिला लग्न करण्यास नकार दिला. मला तुझ्याबद्दल फीलिंग्ज नाहीत, असे तो म्हणाला होता. प्रशांतलाही तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असेही समोर आले आहे.