दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:24 IST2025-05-10T16:23:56+5:302025-05-10T16:24:47+5:30
संरक्षणमंत्री काळात नऊ टक्के मुलींना संधी

दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग : शरद पवार
सातारा : पाकिस्तानने दहशतवाद्यांशी संबंध कितीही नाकारले, तरी ठार केलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाक सैनिक आणि त्यांचे सरकारी प्रतिनिधी कसे हजर राहतात? त्यामुळे दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तान सरकारचा सहभाग स्पष्ट होतो, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “दहशतवादी हल्ल्यापासून सर्वांच्या नजरा टीव्ही चॅनेलकडे आहेत. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला धडा शिकविला. ठार झालेल्या दहशतवाद्यांना निरोप देताना पाकिस्तानचे प्रतिनिधी हजर राहतात. याचाच अर्थ, दहशतवादी कृत्यांच्या पाठीमागे त्या देशाची सत्ता आहे. सैन्यदलात अनेक महिलाही कर्तृत्व गाजवत असल्याचा आनंद आहे. पाकिस्तानवरील कारवाईची माहिती सैन्यातील ज्या दोन भगिनींनी दिली. त्यापैकी एक बेळगाव येथील सोफिया कुरेशी असून, मुस्लीम समाजातील आहेत. देशातील सर्व समाज घटक देशाच्या रक्षणासाठी पडेल, ती किंमत देण्यासाठी तयार आहेत.”
संरक्षणमंत्री काळात नऊ टक्के मुलींना संधी
मी संरक्षणमंत्री असताना तिन्ही दलांच्या प्रमुख, परराष्ट्र खाते आणि संरक्षण दलाचे सचिव दररोज आढावा बैठक घेत असे. एका बैठकीमध्ये मी सैन्यदलात महिलांच्या सहभागाचा मुद्दा मांडला असता, तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी अशक्यता दर्शविली. पुढील दोन बैठकांत हेच घडले. मात्र, चौथ्या बैठकीत मी भारताच्या सैन्यात नऊ टक्के मुलींना संधी देण्याचा निर्णय घेतला, असे पवार म्हणाले.