..अन्यथा कारखाने भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागे-पुढे बघणार नाहीत - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:45 IST2025-10-13T17:42:42+5:302025-10-13T17:45:03+5:30
टनाला १५ रुपये शेतकरी देणार नाहीत

..अन्यथा कारखाने भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागे-पुढे बघणार नाहीत - राजू शेट्टी
औंध : ‘निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. कारखाने ऊस आम्हाला द्या म्हणून मागे लागतील. परंतु शेतकऱ्यांनी ऊसतोडीची गडबड करू नये, अन्यथा कारखाने भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागे-पुढे बघणार नाहीत. कारखानदार समाजसुधारक नसून लुटारूंची टोळी आहे. यंदा दराची काळजी करू नका. स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्याला उच्चांकी दर मिळवून देणार आहे,’ असे प्रतिपादन शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
गोपूज ता. खटाव येथे रविवारी ऊस दर निर्णायक बैठकीत ते बोलत होते. या वेळी सूर्यकांत भुजबळ, राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, अर्जुन साळुंखे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे, प्रदेश सरचिटणीस, सूर्यभान जाधव, जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, अनिल कचरे, शरद खाडे, सचिन पवार, संतोष तुपे, सचिन जाधव, जयवंत खराडे, बापू निंबाळकर यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, ‘साखर कारखानदारांची पाचही बोटे तुपात आहेत. रिकव्हरी व काटा चोरी करून काळा पैसा कमावण्याचा त्यांचा धंदा आहे. १९६६ च्या कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत ऊस बिल अदा करावे असा कायदा असतानाही शेतकऱ्यांना वर्षभर वाट पाहावी लागत आहे. एक टनाचे पैसे कारखानदार पावणे सात हजार रुपये करत आहेत आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटलं की परवडत नाही असा नारा देतात.
यंदा ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांच्या प्रचंड स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता आपल्या कष्टाने पिकवलेल्या ऊस पिकाचे योग्य दाम घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. खांडसरी व गूळ उत्पादन करणारे कारखानेसुद्धा एफआरपीच्या कायद्यात आहेत याची नोंद घ्या. दरम्यान लांडेवाडी, उंबर्डे, वडूज, चितळी, बनपुरीमधील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बिल्ला लावून प्रवेश केला.
टनाला १५ रुपये शेतकरी देणार नाहीत
महाराष्ट्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसबिलांमधून प्रतिटन १५ रुपये कपात करण्याचा निर्णय मंजूर केला आहे. आम्ही ती कपात करून देणार नाही. कर्जबुडव्या उद्योगपतीकडून व मोठ्या उद्योजकाकडून घ्यावी शेतकरी वर्गाचे पैसे घेऊ देणार नसल्याचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.
एआय तंत्रज्ञान वापरा
ऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान वापरा, असे कारखानदार सांगत आहेत. मात्र अगोदर तुमच्या रिकव्हरी व काट्यात या तंत्रज्ञानाचा वापर करा व शेतकऱ्यांची लूट थांबवा, असेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.