Satara ZP: राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’; ‘ऑपरेशन लोटस’ राबवित भाजपने सत्ता खेचून आणली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:26 IST2026-03-21T14:25:52+5:302026-03-21T14:26:33+5:30

अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विराजमान

Operation Lotus a success; BJP's Priya Shinde elected as president of Satara Zilla Parishad | Satara ZP: राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’; ‘ऑपरेशन लोटस’ राबवित भाजपने सत्ता खेचून आणली

Satara ZP: राष्ट्रवादी-शिंदेसेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’; ‘ऑपरेशन लोटस’ राबवित भाजपने सत्ता खेचून आणली

सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे तीन आणि शिंदेसेनेचे दोन सदस्य फोडून ‘ऑपरेशन लोटस’ राबवित सत्ता अक्षरक्ष: खेचून आणली. यामुळे अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विराजमान झाले. पण, या निवडीवेळी पोलिसांच्या कडक बंदोबस्ताने जिल्हा परिषद परिसराला छावणीचे स्वरुप आले होते. त्यातच पालकमंत्री शंभूराज देसाई आणि भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यात निवडीच्या वेळी सभागृहात वाद पेटला. या घडामोडीत पालकमंत्र्यांच्या हाताला दुखापत झाल्याने डाॅक्टरांना पाचारण करावे लागले.

सातारा जिल्हा परिषदेची ६५ गटांसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक झाली. ९ फेब्रुवारीला निकालात भाजपने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी (अजित पवार) २०, शिंदेसेनेने १५, तर काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. एक अपक्षही विजयी झाला होता. या अपक्षाने भाजपला पाठिंबा दिला. तरीही भाजपला बहुमतासाठी पाच सदस्यांचे बळ हवे होते, तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने एकत्र येत सत्ता स्थापनेचा निर्धार केला होता. शिवाय त्यांना काँग्रेस आणि स्वाभिमानीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला होता.

मात्र, भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ राबविण्याच्या धास्तीने राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेकडे ३५ सदस्यांचे बहुमत असूनही त्यांनी सर्व सदस्यांना महिनाभर सहलीला अज्ञानस्थळी नेले होते. दोन्ही पक्षांचे सदस्य ट्रॅव्हलमधून शुक्रवारी दुपारी १२:३० वाजता मतदानासाठी जिल्हा परिषदेत दाखल झाले.

दरम्यान, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे व सार्वजनिक बांधकाममंत्री शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या स्थानिक नेते व आमदारांनी ऑपरेशन लोटसचा प्रयोग केला. गुरुवारी (दि. १९) रात्रीपासून त्यांनी राष्ट्रवादी - शिंदेसेनेचे सदस्य फोडण्याचे राजकारण सुरू केले. त्यामध्ये पाच सदस्य त्यांच्या हाती लागले.

पती शिंदेसेनेचे आमदार; पत्नी भाजपकडून अध्यक्षा

कोरेगाव मतदारसंघाचे आमदार शिंदेसेनेचे महेश शिंदे हे आहेत. त्यांच्या पत्नी प्रिया शिंदे या खटाव तालुक्यातील खटाव गटातून खुल्या प्रवर्गातून जिल्हा परिषद सदस्या झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. शिंदे यांना भाजपने अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवले. त्यांना ३३ मते मिळाली; तर राष्ट्रवादीच्या सदस्या मनीषा फडतरे यांना ३० मते मिळाली. उपाध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार राजू भोसले यांनाही ३३ मते मिळाल्याने त्यांनी शिंदेसेनेचे उमेदवार अशोक पाटील यांचा पराभव केला.

अनिल देसाई, संदीप मांडवे पोलिसांच्या ताब्यात

जिल्हा परिषदेत शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता भाजपचे सदस्य हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी आले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे सदस्य आले. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतून खटाव तालुक्यातील औंध गटाच्या मनीषा फडतरे यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी शिंदेसेनेकडून पाटण तालुक्यातील सदस्य अशोक पाटील यांनी अर्ज भरला होता. दुपारी १२:१५च्या सुमारास सर्वच पक्षांचे सदस्य जिल्हा परिषदेत ट्रॅव्हल्समधून आले. त्यावेळी राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे जिल्हा परिषदेच्या सभागृहात जात होते. त्याचवेळी पोलिसांनी दोघांना सभागृहाबाहेरच वाई पोलिस ठाण्यात दाखल एका तक्रारीच्या अनुषंगाने ताब्यात घेतले. तेथूनच दोघांना बाहेर नेण्यात आले. त्यामुळे त्यांना सभागृहात मतदानासाठी जाता आले नाही.

पालकमंत्री देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यात बाचाबाची

जिल्हा परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे सभागृहात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे सदस्य कामेश कांबळे यांच्याबरोबर मंत्री शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी पालकमंत्री देसाई यांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी दोघांत बाचाबाची झाली, असे सांगण्यात आले. तसेच याचदरम्यान, पालकमंत्री यांच्या डाव्या हाताच्या बोटाला जखम झाली. त्यांना बीपीचाही त्रास होऊ लागला. त्यामुळे डाॅक्टरांना बोलावण्यात आले होते. त्यांच्या बोटाला ड्रेसिंग करण्यात आल्याने सभागृहात तणावाचे वातावरण झाले.

Web Title : सतारा जिला परिषद चुनाव में भाजपा का 'ऑपरेशन लोटस' सफल।

Web Summary : भाजपा ने 'ऑपरेशन लोटस' के माध्यम से सतारा जिला परिषद अध्यक्ष पद हासिल किया। प्रिया शिंदे अध्यक्ष और राजू भोसले उपाध्यक्ष बने। राजनीतिक झड़पें और पुलिस की मौजूदगी जीत में शामिल थी।

Web Title : BJP's 'Operation Lotus' succeeds in Satara Zilla Parishad election.

Web Summary : BJP secured Satara Zilla Parishad presidency through 'Operation Lotus,' winning the election. Priya Shinde is now president, Raju Bhosale vice-president. Political clashes and police presence marked the victory.