Crime News Satara: साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या, कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 17:04 IST2022-07-02T16:34:24+5:302022-07-02T17:04:26+5:30
पोलिसांची घटनास्थळी धाव

Crime News Satara: साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या, कारण अस्पष्ट
सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकानजीक असलेल्या नटराज मंदिराबाहेर आज, शनिवारी दुपारी एका अनोळखी तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकालगत नटराज मंदिर आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारा समोरच दुपारी २५ ते ३० वर्षांच्या तरुणाचा डोक्यात गोळी झाडून अज्ञाताने खून केला असल्याचे समोर आले. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. बघ्यांचीही गर्दी झाली. भरदिवसा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली.
पोलिसांनी संबंधित तरुणाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तर दुसरीकडे संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे. नटराज मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. जोपर्यंत खून झालेल्या तरुणाची ओळख पटत नाही. तोपर्यंत हा खून कोणी केला व त्याचे कारण काय, हे समोर येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सातारा शहर पोलीस ठाण्यात या खून प्रकरणाची अद्याप नोंद झाली नव्हती.