माउलींचा सोहळा पाऊससरी झेलत सातारा जिल्ह्यातून पुण्याकडे मार्गस्थ, परतीच्या प्रवासातही माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 17:45 IST2025-07-16T17:43:17+5:302025-07-16T17:45:49+5:30
वारकऱ्यांना माउलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले

माउलींचा सोहळा पाऊससरी झेलत सातारा जिल्ह्यातून पुण्याकडे मार्गस्थ, परतीच्या प्रवासातही माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान
लोणंद : आषाढी एकादशीच्या पांडुरंगाच्या दर्शनानंतर मंगळवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पावसाच्या सरी झेलत साताऱ्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या प्रवासातील सातारा जिल्ह्यातील पाडेगाव ते पुणे जिल्ह्यातील वाल्हे हे सर्वात कमी अंतराचा टप्पा आज होता. परतीच्या प्रवासातही माउलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले. नीरा स्नानानंतर परतीच्या वारीत चालत चाललेल्या टाळकरी, विणेकरी, पताकाधारी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांना माउलींच्या पादुकांचे स्पर्श दर्शन दिले गेले.
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचा सोमवार, दि. १४ रोजी सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे मुक्काम होता. मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून पावसाने दमदार सुरुवात केली. पावसाच्या सरी अंगावर झेलत सकाळी आठ वाजता पालखी सोहळा नीरा नदीकिनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माउलींच्या पादुका सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे नीरा नदीतील स्नानासाठी देण्यात आल्या. आरफळकर, देखणे, योगी निरंजननाथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ज्ञानोबा माउली.. ज्ञानोबा माउली..’च्या जयघोषात प्रसिद्ध दत्ता घाटावर माउलींच्या पादुकांना स्नान घातले.
माउलींचे स्नान सुरू असताना सोहळ्यासोबत आलेले पुरुष विणेकरी, पताकाधारक व तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी ब्रिटिशकालीन पुलावरील रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथामागील व नंतर रथापुढील विणेकऱ्यांसह पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना माउलींच्या पादुकांचे स्पर्शदर्शन देण्यात आले. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा ‘माउली..माउलीं’च्या जयघोषात पावसाच्या सरीत मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडला.
यानंतर माउलींच्या सोहळ्याने सकाळी नऊ वाजता पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश करत माउलींची पालखी विठ्ठल मंदिरात साडेनऊच्या सुमारास विसाव्यासाठी ठेवण्यात आली. दुपारी दोन वाजता हा सोहळा पुणे जिल्ह्यातील पहिला मुक्काम असलेल्या वाल्हेकडे मार्गस्थ झाला.