Satara: ‘कृष्णा’च्या पाण्यात जलपर्णीचा ‘कालवा’, कॅनॉलला विळखा
By संजय पाटील | Updated: May 19, 2025 16:21 IST2025-05-19T16:20:50+5:302025-05-19T16:21:45+5:30
काटेरी झुडपे, गवताचे साम्राज्य; सातारा, सांगलीत लाभक्षेत्र असूनही दुर्लक्ष, पाणी पोहोचेपर्यंत संपते आवर्तन

Satara: ‘कृष्णा’च्या पाण्यात जलपर्णीचा ‘कालवा’, कॅनॉलला विळखा
संजय पाटील
कऱ्हाड : साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीक्षेत्राची तहान भागविणाऱ्या कृष्णा कालव्यात सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. मात्र, कऱ्हाडपासूनच या कालव्याला जलपर्णीने वेढले असून ठिकठिकाणी मोठी पडझड झाल्याने प्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. जलपर्णी, काटेरी झुडपे, दगडांचा खच आणि दगड-मातीच्या ढिगाऱ्यामुळे कालव्याचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र आहे.
कऱ्हाड तालुक्यात कृष्णा नदीवर असलेल्या खोडशी बंधाऱ्यातून कृष्णा कालवा सुरू होतो. तेथून सैदापूरसह कऱ्हाड तालुक्यातील अन्य गावे व पुढे सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतून हा कालवा जातो. मात्र, सैदापूर येथे नागरी वस्त्यांचे सांडपाणी थेट कालव्यात सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. तसेच अन्यही कारणांमुळे कालव्याची मोठी वाताहत झाली आहे. जलपर्णी, गवत, झुडपे कालव्याच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर उगवली आहेत. त्यामुळे संपूर्ण कालवा झाकोळला गेला आहे. काही ठिकाणी तर इथून कालवा वाहतो, यावर विश्वासच बसणार नाही एवढी भयावह स्थिती आहे. जलपर्णीने पाण्याचे पात्रच दिसेनासे झाले आहे.
देखभालीकडे होतेय दुर्लक्ष
जलपर्णीने व्यापलेल्या कालव्याचे अस्तित्वच सध्या धोक्यात आले आहे. एवढी कालव्याची दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करणाऱ्या पाटबंधारे विभागाचे कालव्याच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
पाणी पोहोचेपर्यंत संपते आवर्तन
- अडथळे निर्माण झाल्यामुळे पाणी गतीने पुढील गावांपर्यंत पोहोचत नाही.
- वेळेत पाणी न पोहोचल्याने शेतकऱ्यांना शेतीलाही पुरेसे पाणी देता येत नाही.
- कालव्याला सोडलेले पाणी शेवटच्या गावात पोहोचेपर्यंत आवर्तन संपते.
- कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.
अनेक वर्षे दुरुस्तीचे काम रखडले
कृष्णा कॅनॉलच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षे कॅनॉल दुरुस्तीचे कामच झालेले नाही. ठिकठिकाणी कॅनॉल खचला आहे. झाडे, झुडपे, जलपर्णी, गवत वाढले आहे. सायपन पुलाशेजारी प्लास्टिक बाटल्या व कचरा साचून राहिला आहे.
लेखाजोखा
- १८६८ : साली कालव्याचे काम पूर्ण
- १८६८ : मधील रब्बी हंगामात पहिल्यांदा सोडले पाणी
- ८६ : किलोमीटर कालव्याची लांबी
- १३,३६६ : हेक्टर सिंचनाखालील क्षेत्र
- ४५ : गावांना होतो पाण्याचा लाभ
सातारा, सांगलीच्या चार तालुक्यांत लाभक्षेत्र
कऱ्हाड तालुक्यातील खोडशी येथे कृष्णा नदीच्या डाव्या तिरावरून कालव्यास प्रारंभ होतो. कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर, गोवारे, टेंभू, कोरेगाव, कार्वे, वडगाव हवेली, शेणोली यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस, तासगाव तालुक्यातून हा कालवा जातो. चार तालुक्यांत कालव्याचे लाभक्षेत्र आहे.