Satara ZP Election 2026: ‘घड्याळा’ला ‘तुतारी’ची साथ; जिल्ह्यात राष्ट्रवादी सुसाट !
By सचिन काकडे | Updated: February 11, 2026 16:59 IST2026-02-11T16:58:58+5:302026-02-11T16:59:51+5:30
भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले : दोन्ही राष्ट्रवादींची एकी पथ्यावर

Satara ZP Election 2026: ‘घड्याळा’ला ‘तुतारी’ची साथ; जिल्ह्यात राष्ट्रवादी सुसाट !
सचिन काकडे
सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावर गेल्या काही काळापासून भाजपचे वाढते वर्चस्व आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे निर्माण झालेली मरगळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाने पूर्णपणे झटकून टाकली. राष्ट्रवादी संपली अशी टीका करणाऱ्या विरोधकांना साताऱ्याच्या मातीने नवा धडा शिकवला. सत्तेत एकमेकांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी एकत्र आल्या. भाजपने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत सर्वशक्तीनिशी चढवलेला हल्ला दोन्ही राष्ट्रवादींच्या अभेद्य युतीने परतवून लावला. परिणामी, जिल्ह्यात भाजपची स्वबळाची घोडदौड रोखण्यात राष्ट्रवादीच्या रणनीतीला यश तर आलेच शिवाय या निकालाने दोन्ही राष्ट्रवादींना उभारीदेखील मिळाली.
'तुतारी’मुळेच ‘घड्याळ’ सुसाट!
साताऱ्याच्या राजकारणात हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. अधिकृतपणे राष्ट्रवादी हे दोन पक्ष असले तरी, कार्यकर्त्यांच्या पातळीवर ‘पवार’ हा एकच विचार प्रभावी ठरला. जिथे तुतारीचा उमेदवार नव्हता, तिथे शरद पवारप्रेमी मतदारांनी एकगठ्ठा मतदान अजित पवार गटाच्या उमेदवाराला केले. जरी तुतारीचे उमेदवार प्रत्यक्ष निवडून आले नसले, तरी त्यांच्या पाठिंब्यामुळेच घड्याळाचे काटे वेगाने फिरले आणि भाजपची सत्तेची गणिते विस्कळीत झाली.
कराड उत्तरची ‘ती’ खंत कायम...
कराड उत्तरमध्ये माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी पालिकेत सत्ता आणली असली, तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत ‘तुतारी’चा आवाज हवा तसा घुमला नाही. येथे शरद पवार गटाची रणनीती स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांना फायदेशीर ठरली. मात्र, स्वतःच्या चिन्हावर उमेदवार निवडून न येण्यामागे काही गुलदस्त्यातील ‘राजकीय तडजोडी’ असल्याची चर्चा आता जिल्ह्यात रंगू लागली आहे.
निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे...
१. नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या धुंदीत भाजपने स्वबळाचा नारा दिला. मात्र, जिल्हा परिषदेत त्यांना शिंदेसेनेसह दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीचा मोठा फटका बसला.
२. शरद पवार गटाने स्वतःचे उमेदवार कमी देऊन अजित पवार गटाच्या उमेदवारांना ताकद दिली. तुतारीने वाजवलेल्या सुरावर घड्याळाने अचूक वेळ साधत ६५ पैकी २० गटांवर कब्जा मिळविला.
३. केवळ दोन्ही राष्ट्रवादीच नव्हे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आखलेली रणनीती यशस्वी झाली.
एकूण गट : ६५
- राष्ट्रवादी (अजित पवार) २०
- एकूण गण : १३०
- राष्ट्रवादी (अजित पवार) ४३
- राष्ट्रवादी (शरद पवार) ०३