Satara: मलकापुरात भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीला राष्ट्रवादी देणार साथ; पक्षाच्या चिन्हावर लढण्याचं ठरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 19:30 IST2025-11-21T19:30:00+5:302025-11-21T19:30:21+5:30
राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धवसेना एकत्र; नेत्यांच्या बैठकांमध्ये निर्णय

Satara: मलकापुरात भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीला राष्ट्रवादी देणार साथ; पक्षाच्या चिन्हावर लढण्याचं ठरलं
माणिक डोंगरे
मलकापूर : मलकापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी अखेर तीन पक्षांची महाआघाडी एकत्र आली. राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धवसेनेचं दोन मागेपुढे सरकण्याचे ठरलं असून, आपापल्या पक्षाच्या चिन्हावर लढण्याचं ठरलं असल्याची खात्रीदायक माहिती आहे. त्यामुळे बहुतांशी प्रभागात दुरंगी लढत होणार, हे निश्चित झाले आहे.
मलकापुरात भाजपमध्ये काँग्रेसमधील बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर मलकापुरात भाजपला एकहाती सहज सत्ता मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, निवडणुकीची प्रक्रिया जशी जशी पुढे येत गेली, तसतसे हळूहळू पर्याय निघत गेल्याची परिस्थिती निर्माण झाली. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या गटातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने बारा ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उद्धवसेनेच्या वतीने दोन प्रभागात उमेदवारी दाखल केली आहे, तर काँग्रेसच्या वतीने तीन प्रभागात उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी अर्ज निश्चित झाल्यापासून दोन दिवसांत बैठकांवर बैठका झाल्या. आजअखेर नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रीय काँग्रेस व उद्धवसेना यांच्यात मेळ बसला. भाजपला रोखण्यासाठी मलकापुरात एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही चिन्हांची एकत्रित प्रचार यंत्रणा तयार करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे मलकापुरात उर्वरित १७ प्रभागांपैकी बहुतांशी प्रभागात दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासह काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांची मात्र एकला चलो ची भूमिका सध्या दिसत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी महाआघाडीच्यावतीने एकच उमेदवार !
मलकापुरात राज्यातील महायुतीत असलेल्या घटक पक्ष राष्ट्रवादी आणि महाआघाडीतील दोन घटक पक्ष काँग्रेस व उद्धवसेना एकत्र येऊन वेगळीच महाआघाडी उदयास आली आहे. या महाआघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदालाही एकच उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मलकापुरात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.