Satara Politics: भाजपच्या मतांवर वाईत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, नेमकं काय घडलं.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:09 IST2026-01-10T16:07:03+5:302026-01-10T16:09:11+5:30
सत्ताधारी आणि विरोधी गटात मतांचे पारडे समसमान पडले, नंतर...

Satara Politics: भाजपच्या मतांवर वाईत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, नेमकं काय घडलं.. वाचा
वाई : वाई नगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस दिसली. सत्ताधारी आणि विरोधी गटात मतांचे पारडे समसमान पडल्यानंतर, नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी ‘कास्टिंग व्होट’ अधिकाराचा वापर केल्याने राष्ट्रवादी (अजित पवार)चे घनश्याम चक्के यांची भाजपच्या मतावर उपनगराध्यक्षपदी निवड झाली. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे शब्बीर पठाण यांची बिनविरोध निवड झाली.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली, तर मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली. यावेळी भाजपचे १०, राष्ट्रवादीचे १२ आणि एक अपक्ष उमेदवार उपस्थित होते. उपनगराध्यक्ष पदासाठी विजय ढेकाणे (भाजप), घनश्याम चक्के (राष्ट्रवादी) आणि सुशील खरात (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले.
भाजपच्या विजय ढेकाणे यांनी अर्ज माघार घेतल्याने चक्के आणि खरात यांच्यात लढत झाली. सभागृहात हात उंचावून झालेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी १२ मते पडली. अखेर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी निर्णायक मत राष्ट्रवादीच्या घनश्याम चक्के यांच्या पारड्यात टाकले आणि चक्के यांची निवड झाली.
उपनगराध्यक्ष निवडीसोबतच स्वीकृत नगरसेवक पदासाठीही सर्वानुमते सचिन जगन्नाथ सावंत (भाजप), शब्बीर दिलावर पठाण (राष्ट्रवादी) यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले. नगरपालिकेच्या विविध विषयांकित समित्यांची सदस्य संख्या सहा ठेवण्याचा निर्णयही या सभेत सर्वानुमते घेण्यात आला.
निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. प्रशासकीय कामकाजासाठी कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी, मोहिते, बागुल आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
चक्के यांचे सूचक, अनुमोदकही भाजपचेच नगरसेवक
राष्ट्रवादीच्या घनश्याम चक्के यांना राष्ट्रवादीकडून एकही मतदान झाले नाही. त्यांना सूचक व अनुमोदक हेही भाजपचे सदस्य होते. यावरून उपनगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादीच्या पारड्यात कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा अपयशी
अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला जाळ्यात ओढून उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पाडली. उपनगराध्यक्ष चक्के हे जरी मी राष्ट्रवादीचा असल्याचे सांगत असले तरीही राष्ट्रवादीने त्यांना एकही मत दिले नाही. यासाठी भाजप तालुकाध्यक्ष दीपक ननावरे यांनी पडद्यामागून मोठी भूमिका बजावल्याचे बोलले जात आहे. यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा वाई नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपयशी ठरला.
मी राष्ट्रवादीचाच आहे. आमचे नेते मकरंद पाटील आहेत. राज्यात आमची महायुती आहे. त्यामुळे भाजपच्या मतांवर मी शहराच्या विकासासाठी उपनगराध्यक्ष झालो आहे. पुढे येईल परिस्थितीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. - घनश्याम चक्के उपनगराध्यक्ष