नवदाम्पत्याला लुटले- बारा तोळे सोने लंपास

By Admin | Updated: July 25, 2014 23:32 IST2014-07-25T23:22:30+5:302014-07-25T23:32:59+5:30

शामगाव घाटात चाकूचा धाक दाखवून मारहाण

Navdampati robbed - Twelve Tola gold lumpas | नवदाम्पत्याला लुटले- बारा तोळे सोने लंपास

नवदाम्पत्याला लुटले- बारा तोळे सोने लंपास

शामगाव (सातारा) : दुचाकीवरून निघालेल्या नवदाम्पत्याला शामगाव घाटात आज, शुक्रवारी चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. चोरट्यांनी विवाहितेच्या गळ्यातील सुमारे बारा तोळ्यांचे दागिने लंपास केले.
पोलिसांनी सांगितले, खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील दिलीप आनंदराव माने व धनश्री यांचा विवाह १२ जुलैला झाला आहे. हे दोघेजण आज दुचाकीवरून रिसवडला नातेवाइकांकडे निघाले होते. नवविवाहित असल्याने दोघांच्याही अंगावर दागिने होते. सकाळी अकराच्या सुमारास दोघेजण शामगाव घाटात आले असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने गाडी आडवी मारून दिलीप व धनश्री यांना अडविले. संबंधित दुचाकीवर दोघेजण होते. दुचाकीवरून उतरताच एकाने दिलीप यांना चाकूचा धाक दाखविला. मारहाण करीत रस्त्यावरून सुमारे दोनशे फूट दरीत असणाऱ्या प्राचीन शिवमंदिराच्या कमानीजवळ नेले. तेथेही दोघांना मारहाण करण्यात आली. धनश्री यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, कर्णफुले, राणीहार, अंगठी व दिलीप यांच्याकडील चेन, बदाम व अंगठी असा सुमारे बारा तोळ्यांचा ऐवज हिसकावून घेऊन चोरटे रस्त्याच्या दिशेने पळाले. त्यांच्या पाठोपाठ धनश्री व दिलीप रस्त्यावर आले असता त्यांच्या दुचाकीची प्लग वायर चोरट्यांनी तोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे धनश्री यांनी तातडीने मोबाईलवरून शामगाव येथील त्यांचे मामा तात्यासाहेब पोळ यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्यासाहेब पोळ हे ग्रामस्थांसह त्याठिकाणी आले. त्यांनी धनश्री व दिलीप यांना धीर देत मसूर पोलीस दूरक्षेत्रात आणले.
पोलीस निरीक्षक आर. एस. चौधरी, हवालदार पी. एस. बाबर, एस. व्ही. शेलार, पी. एम. कोकाटे, एस. एस. भोसले, एच. जी. घाडगे, एस. टी. साळुंखे, यांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. या घटनेची नोंद मसूर पोलीस दूरक्षेत्रात झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Navdampati robbed - Twelve Tola gold lumpas