पतंगाच्या मांजाने गळा कापून दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: August 19, 2015 23:08 IST2015-08-19T23:08:55+5:302015-08-19T23:08:55+5:30

फलटणमध्ये बालक ठार : बारामती तालुक्यात इसमाचा मृत्यू; पाच जखमी

The moth of a moth slit the throat and die of both | पतंगाच्या मांजाने गळा कापून दोघांचा मृत्यू

पतंगाच्या मांजाने गळा कापून दोघांचा मृत्यू


फलटण : मोटारसायकलवरून आई-वडिलांसोबत जात असताना बालकाचा पतंगाच्या चायना मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना फलटण येथे बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली. तसेच ढवळेवाडी येथील एका इसमाचाही याच मांजामुळे बारामती तालुक्यातील मेखळी येथे मृत्यू झाला. दरम्यान, या मांजामुळे आणखी पाचजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
उस्मान रियाज शेख (वय ६, रा. लोणंद ता. खंडाळा) असे मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रियाज शेख हे पत्नी व दोन मुलांसमवेत मोटारसायकलवरून सोमवार पेठेत आले होते. दुसऱ्या मुलाला मदरशामध्ये ठेवून ते दुपारी अडीच वाजता लहान मुलगा उस्मानला घेऊन ते घरी यायला निघाले. त्यावेळी मोटारसायकलवर उस्मान पुढे बसला होता.
सोमवार पेठेमध्ये आल्यानंतर अचानक उस्मानच्या गळ्याला मांजा अडकला. मोटारसायकल थांबेपर्यंत मांजाने उस्मानचा निम्मा गळा कापला. रियाज यांच्या हा प्रकार लक्षात येईपर्यंत फार वेळ झाला होता. उस्मानच्या गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. परंतु तरीही वडील रियाज यांनी त्याला तत्काळ खासगी दवाखान्यात नेले. मात्र, डॉक्टरांनी उस्मानला मृत घोषित केले. रियाज शेख हे लोणंद येथील मशिदीत इमाम म्हणून काम करतात. (प्रतिनिधी)
अन् पोलिसांनी मांजा कापला !
या घटनेनंतर पोलिसांनी शहरात फेरफटका मारून पतंग उडविणाऱ्या मुलांना पतंग उडविण्यापासून परावृत्त केले. शुक्रवार पेठेतील बाणगंगा नदीकाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. काही मुले पतंग उडवित होते, त्यांचा मांजा पोलिसांनी कात्रीने कापून टाकला.

महादेव केंगारही मृत
ढवळेवाडी, ता. फलटण येथील महादेव लक्ष्मण केंगार (वय ४५) हे आपल्या मुलासह बारामती तालुक्यात गेले होते. मेखळीकडून ढवळेवाडीला परतत असताना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पतंगाच्या मांजामुळे ते जखमी झाले. त्यांना मुलाने तत्काळ बारामतीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: The moth of a moth slit the throat and die of both