Mahatma Phule Punyatithi: राज्यकर्ते अन् शिक्षण विभागासही कटगुणचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:36 IST2025-11-28T15:56:03+5:302025-11-28T16:36:54+5:30
Mahatma Phule's Death Anniversary: शिल्पसृष्टीसाठी बांधलेली इमारत धूळ खात पडून..

Mahatma Phule Punyatithi: राज्यकर्ते अन् शिक्षण विभागासही कटगुणचा विसर
केशव जाधव
पुसेगाव : स्वातंत्र, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, सामाजिक व आर्थिक न्याय शोषणविरहित समाज रचना, समान संधी अशा महान नैतिक मूल्यावर आधारित समाजरचनेचे स्वप्न ज्या महात्मा फुले यांनी पाहिले त्यांच्याच कुलभूमी असलेल्या खटाव तालुक्यातील कटगुणकडे मात्र केवळ जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यापुरतेच पाहिले जात आहे. राज्यासह या परिसरातील फुलेंप्रेमी व ग्रामस्थांनी तयार केलेला पर्यटन विकास कार्यक्रम आराखडा अद्याप शासनाच्या लालफितीत अडकून पडला आहे. कटगुण या कुलभूमीचा ‘मास्टर प्लॅन तयार’ व्हावा व त्यानुसार शासनाने या गावाचा विकास करावा एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, येथे भित्तीचित्र दालन व शिल्पसृष्टी उभारून कटगुणला पर्यटनस्थळाचा ‘अ’ दर्जा देण्याची मागणी कित्येक वर्षे प्रलंबितच आहे. आज केवळ महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या दाम्पत्याला ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्याबरोबरच कुलभूमी कटगुणच्या विकासातही लक्ष घालावे, अशी मागणी लोकांच्यातून होत आहे.
पुसेगावपासून पूर्वेला केवळ तीन किलोमीटर अंतरावर कटगुण महात्मा फुले यांची कुलभूमी. मात्र शासनाचा ढिसाळ कारभार व लोकप्रतिनिधींची उदासीनता यामुळे कटगुण अद्याप दुर्लक्षित राहिले आहे. कुलभूमीत सुधारणा करण्याचे औदार्य शासनकर्त्यांनी अद्याप दाखविले नाही. केवळ तुटपुंज्या निधी देऊन ग्रामस्थांची बोळवण केली जात आहे.
गावात फुले यांच्या मालकीच्या जागेतच स्मारकाची भव्य इमारत आहे. लगतच असलेल्या ‘महात्मा फुले सांस्कृतिक भवन’ या इमारतीची दुरवस्था झाली आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सर्व पत्रा पूर्णपणे गंजला आहे. संरक्षक भिंत आणि चबुतऱ्याच्या शिडीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पडझड झाली आहे. स्मारकाची देखभालीसाठी कायमस्वरूपी कोणीही व्यक्ती नाही. स्मारक परिसरात फुले यांचा पुतळा उभारण्यासाठी बांधलेल्या चबुतऱ्यावर शासनाच्या धोरणामुळे तब्बल दहा-बारा वर्षांनंतर म्हणजे २००९ साली पुतळा बसला. कोणतेही शासकीय अनुदान प्राप्त होत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून कटगुण येथे अकलुजप्रमाणे शिल्पसृष्टी जीवनपट तसेच भित्तीचित्र दालन उभारण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते; पण यासाठी उभारलेली भव्य इमारत आजही रिकामीच आहे. फुले यांच्या पूर्वजांचा वाडा स्मारकाबरोबरच जीर्णावस्थेत या वाड्याचे दगड, माती लाकडी तुळ्या जागीच पडल्या आहेत. या गावात वर्षभरात अनेक फुलप्रेमी, अभ्यासक आवर्जून येतात, वाड्याची दयनीय अवस्था पाहून खंत व्यक्त करतात.
पर्यटन आराखडा अद्याप कागदावरच!
कटगुणला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, याबाबतचा आराखडा शासनदरबारी सादर केला आहे. फुले यांची शिल्पसृष्टी होणार, मोठा निधीही आणणारच अशा घोषणा प्रत्येक कार्यक्रमात नेतेमंडळी व्यासपीठावर देतात; मात्र अद्याप काहीही झालेले नाही. तयार केलेला पर्यटन विकास कार्यक्रम आराखडा अद्याप शासनाच्या लालफितीत अडकून पडला आहे.
शिल्पसृष्टीसाठी बांधलेली इमारत धूळ खात पडून..
महात्मा फुले कटगुणला आल्यावर दीनदुबळ्या व दलित लोकांच्या बैठका ज्या बौद्धविहारात घेत असत, त्या विहाराचा कायापालट, स्मारक परिसरात बगिचा व सुशोभिकरण, गावातील कित्येक अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, स्मारक पटांगणात बहुउद्देशीय सभागृह, पटांगणात बागबगिचा, भित्तीचित्र दालन, शिल्पसृष्टी साकारणे, स्मारकाच्या इमारतीत शासकीय ग्रंथालय वाचनालय, व्यायामशाळा आदी विकासकामांबाबत लोकप्रतिनिधींचा कानाडोळा होताना दिसत आहे. फुले यांच्या जीवनातील ठळक प्रसंग शिल्प स्वरूपात अर्थात शिल्पसृष्टी व भित्तीचित्र दालन उभारण्यासाठी बांधलेली इमारत अद्यापही धूळ खात पडून आहे.