पाटणच्या ‘ज्योती’ची तेजाळली गोव्यात किरणे!

By Admin | Updated: November 24, 2015 00:27 IST2015-11-23T22:58:35+5:302015-11-24T00:27:28+5:30

ग्रामस्वच्छतेचे धडे : निसरे येथील सुर्वेची ‘यशदा’मार्फत राज्य प्रशिक्षक म्हणून निवड -- गुड न्यूज

The light of Patan's 'Jyoti' radiates in Goa! | पाटणच्या ‘ज्योती’ची तेजाळली गोव्यात किरणे!

पाटणच्या ‘ज्योती’ची तेजाळली गोव्यात किरणे!

अरुण पवार- पाटण --सतत लोकांसाठी धडपडत राहण्याची स्वभाववृत्ती व हास्य चेहऱ्याने बोलकेपणाची सवय असलेल्या पाटण तालुक्यातील निसरे गावच्या ज्योती सुर्वे हिने पुण्यातील यशदा संस्थेद्वारे राज्य प्रशिक्षक म्हणून गोव्यातील ग्रामीण भागातील गावांमध्ये जाऊन तेथील लोकांना, राज्याचा निर्मल ग्राम पॅटर्न सांगण्याचे धडे दिले. ज्योतीची ही कामगिरी एक महिला म्हणून नक्कीच कौतुकास्पद आहे. यशदा संस्थेने शासकीय अधिकारी, मंत्री, पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. त्या संस्थेत २००९ सालापासून एक परफेक्ट व्यक्तिमत्त्व म्हणून निसरे येथील ज्योती सुर्वे हिची निवड झाली आहे. ज्योती आता राज्य प्रशिक्षक म्हणून नुकतीच गोव्यातील राशेल, वेळगे, इब्राहमपूर, ख्वाडा या गावांत जाऊन तेथील लोकांना ‘आदर्श ग्राम’ योजनेचे प्रशिक्षण देऊन परतली आहे. चौदा वित्त आयोग आणि संसद आदर्श ग्राम योजना या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यात सुमारे वीस दिवस ज्योती गोव्यातील गावांना भेट देत होती. शासकीय यंत्रणा व आमदार, खासदार यांची मोलाची मदत मिळाल्याचे ती सांगते. महाराष्ट्रभर राबविलेल्या शौचालय चळवळ, अंगणवाडी प्रकल्प, ग्रामस्वच्छता याची प्रात्यक्षिके दाखवून त्याचा अहवाल यशदामार्फत गोवा सरकारला सादर करण्याचे काम ज्योती सुर्वे व तिच्या पथकाने केले आहे.

गोव्यातील हायटेक संस्थेचा अनुभव
पाटणसारख्या दुर्गम भागातून गेलेल्या ज्योती सुर्वेची वक्तृत्वावर चांगली पकड असून, इंग्रजी, हिंदी भाषेवर तिचे प्रभुत्व आहे. त्यामुळे गोवा इन्स्टिट्यूट आॅफ डायरेक्टर जनरल पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन रूरल डेव्हलपमेंट (गिफाड) या संस्थेतील मॅक्यू सॅमुअल, जी. पी. पिलानेकर, विमा फर्नांडीस, सरिता पाटील या लोकांचा सहवास तिला मिळाला.
गोव्यातील खासदार शांताराम नाईक, आमदार रिझनल फर्नांडीस यांच्या मतदारसंघातील दक्षिण गोव्यामधील गावांमध्ये ट्रेनर म्हणून जाऊन ज्योती सुर्वे हिने पंचायत राज गोवा अभियानात भाग घेतला.


मुळातच निसरे येथे असताना मी क्रांतिज्योती नावाची सामाजिक संस्था उभारून तालुक्यातील गुंजाळी गावांसाठी रस्ते, पिण्याच्या पाण्याची योजना, शिक्षण यासाठी काम केले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट झाली. त्यांची प्रेरणा घेऊनच मी आज यशदामध्ये काम करते.
- ज्योती सुर्वे

Web Title: The light of Patan's 'Jyoti' radiates in Goa!