शेतकऱ्यांसमोरच बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:46 IST2021-09-08T04:46:54+5:302021-09-08T04:46:54+5:30

चाफळ : चाफळ विभागातील दाढोली येथे मंगळवारी शांताराम सखाराम डांगे यांच्या शेळीवर बिबट्याने दिवसाढवळ्या हल्ला चढवून ठार मारल्याची घटना ...

Leopard attacks goats in front of farmers | शेतकऱ्यांसमोरच बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला

शेतकऱ्यांसमोरच बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला

चाफळ : चाफळ विभागातील दाढोली येथे मंगळवारी शांताराम सखाराम डांगे यांच्या शेळीवर बिबट्याने दिवसाढवळ्या हल्ला चढवून ठार मारल्याची घटना घडली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले आहे.

चाफळ परिसरात अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर कायम आहे. बिबट्यांकडून वारंवार शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर हल्ले चढवून ठार मारण्याच्या घटना घडत आहेत. बिबट्याने काही दिवसांपासून थेट मानवी वस्तीत प्रवेश करत अनेक शेळ्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे दिवसाही घराबाहेर पडण्यास ग्रामस्थ घाबरू लागले आहेत. भूक भागवण्यासाठी बिबट्या अनेक गावा-गावात, वाडी-वस्तीवर जाऊन पाळीव प्राण्यावर हल्ले चढवू लागला आहे. चाफळ विभागात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याचे वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. चाफळ, जाधववाडी, जाळगेवाडी, माजगाव नंतर आता हा बिबट्या गमेवाडी, खोनोली, दाढोली गावांकडे सरकला आहे. बिबट्या थेट भरवस्तीत हल्ले करू लागल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. असे असताना वनविभाग कोणतीच उपाय योजना करताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे.

दाढोली येथील शांताराम सखाराम डांगे हे भैरू काटा नावाच्या शिवारात मंगळवारी शेळी चारत होते. अचानक बिबट्याने हल्ला चढवून शेळीला जागीच ठार मारले. डांगे यांच्यासमोरच हा थरार सुरू होता. त्यांनी बिबट्याला हटकण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर बिबट्याने तेथून पळ काढला; पण तोपर्यंत शेळी मृत पावली होती.

कोट

विभागातील चाफळ, माजगाव, जाळगेवाडी, जाधववाडी, बोर्गेवाडी, शिंगणवाडीसह ४० गावांत बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. शेळ्यांवर यापूर्वी बिबट्याने हल्ले चढवून शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आणले आहे. हा बिबट्या अचानक शेळ्यांवर व जनावरांच्या शेडमध्ये घुसून हल्ले चढवू लागला आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Leopard attacks goats in front of farmers