बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून परस्पर जमीन विकली, पुणे-साताऱ्यातील सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:34 IST2026-01-24T17:32:41+5:302026-01-24T17:34:14+5:30
कोट्यवधी रुपयांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न

बनावट कुलमुखत्यारपत्र बनवून परस्पर जमीन विकली, पुणे-साताऱ्यातील सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा
महाबळेश्वर (जि.सातारा) : महाबळेश्वर तालुक्यात कोट्यवधी रुपयांची शेतजमीन हडप करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) तयार करून जमीन परस्पर विक्री केली. त्यातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे व सातारा जिल्ह्यांतील सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
विष्णू उत्तम सूर्यवंशी, पोपट बाळासाहेब गुंडगळ, आशुतोष शंकरराव कदम, दीपक कृष्णकांत कदम, रणजित विश्वासराव काळभोर, प्रीतम संतोष काळभोर, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी आराधना संजयकुमार प्रसाद (वय ५४, रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आराधना प्रसाद यांच्या वडिलांच्या मालकीची महाबळेश्वर तालुक्यातील पारुट येथील गट ३७/१, क्षेत्रफळ ४ हेक्टर ६२ आर, तसेच देवळी येथील बाबू धोंडू ढेबे यांच्या नावावर असलेली गट ७३/१, क्षेत्रफळ ० हेक्टर ९१ आर, अशी कोट्यवधी रुपयांची जमीन होती. ती संशयितांनी संगनमताने हडप करण्याचा प्रयत्न केला.
तपासादरम्यान मुख्य आरोपी विष्णू उत्तम सूर्यवंशी (रा. बीडी बाजाराजवळ, शिक्रापूर, पुणे) याने १५ जून १९९८ रोजीचे खोटे व बनावट कुलमुखत्यारपत्र तयार केल्याचे निष्पन्न झाले. या बनावट दस्तऐवजाच्या आधारे २८ ऑगस्ट २०२५ रोजी पोपट बाळासाहेब गुंडगळ (रा. आर्मिश कॉलनी, निंबाळकरनगर, ताथवडे खंडन कार्यालयाजवळ, जांभे, पुणे) याच्याशी खरेदीखत करून जमीन बेकायदेशीररीत्या विक्री केल्याचा आरोप आहे.
हा व्यवहार कायदेशीर असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी इतर आरोपींनीही सक्रिय सहभाग घेतल्याचे तपासात उघड झाले आहे. आशुतोष शंकरराव कदम (रा. कात्रज, पुणे) व दीपक कृष्णकांत कदम (रा. बुधवार पेठ, पुणे) यांनी साक्षीदार म्हणून, तर रणजित विश्वासराव काळभोर व प्रीतम संतोष काळभोर (दोघेही रा. पाल, ता. कराड) यांनी ओळखदार म्हणून सह्या केल्याचे समोर आले आहे.
तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध फसवणूक, तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच महाबळेश्वर तालुक्यात अशा स्वरूपाचे इतर व्यवहार झाले आहेत का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.