सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार असल्याने पाणीसाठा ७० टीएमसीजवळ पोहोचला आहे. यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार दिवसांतच धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करावा लागणार आहे. परिणामी, कोयना नदीची पाणी पातळीही वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही आढावा घेऊन सांगली व कोल्हापूरच्या कृष्णाकाठाची पूरस्थिती टाळण्यासाठी विसर्गाचे नियोजन करावे, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाला सोमवारी दिली.कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे १०५.२५ टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणातील साठाही वेगाने वाढू लागला आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास धरणात ६९.०४ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यातच सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनिट सुरू असून, त्यातून २ हजार १०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाचे दरवाजे उघडावे लागणार आहेत.
कोयना धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीजवळ पोहोचल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोयना धरणातील पाणी पातळी, पाऊस यांचा प्रशासनाकडून सोमवारी आढावा घेतला. तसेच काही सूचनाही केल्या. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गावांना सतर्कतेचा इशारा द्या : शंभूराज देसाईकोयना धरणात साधारण ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. पाणी विसर्गामुळे पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरणातील पाणी सोडण्याचे आतापासूनच नियोजन करा, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री देसाई यांनी केली. तसेच कोयना धरणातून पाणी सोडताना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा द्यावा. तलाठी, मंडळाधिकारी, पोलिस पाटील यांच्या बैठका घ्याव्यात. पुराच्या पाण्याचा धोका आहे, अशा गावांमध्ये उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे.
७३ टीएमसी साठ्याला दरवाजाला पाणी..कोयनानगर येथे आतापर्यंत २ हजार ४३ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर धरणातील साठा ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर आहे. मागील काही दिवसांपासून धरणातील पाणीसाठ्यात दररोज २ ते ३ टीएमसीने वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास गुरुवारपर्यंत धरणाच्या दरवाजातून विसर्गाची शक्यता आहे. कारण, धरणात ७३ टीएमसी पाणीसाठा झाल्यास दरवाजाला पाणी लागते, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.