Satara: कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, २३ हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठी सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:39 IST2025-07-26T19:37:19+5:302025-07-26T19:39:52+5:30

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर

Koyna Dam gates reopened as rains increase in Satara district | Satara: कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, २३ हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठी सतर्कतेचा इशारा

छाया : वैभव देशमुख

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम घाट आणि प्रमुख धरणक्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला २२६ तर वाई तालुक्यातील जोर येथे ३१६ मिलिमीटरची नोंद झाली. हे या वर्षातील सर्वाधिक पर्जन्यमान ठरले. तर कोयना पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर असल्याने धरणाचे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास सहा दरवाजे पाच फूट उचलून २० हजार ९०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा एकूण २३ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. दररोज पावसात वाढ होत चालली आहे. विशेष करून पश्चिम भागात घाटमाथा आणि कांदाटी, कोयना खोऱ्यात मुसळधार पाऊस पडू लागलाय. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख मोठ्या प्रकल्प क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्गही वाढविण्यात येत आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १३३, नवजा १८८ आणि महाबळेश्वरला २२६ मिलिमीटर पाऊस झाला. कोयना पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस असल्याने सकाळच्या सुमारास धरणात ४२ हजार ५८८ क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ८१.८७ टीएमसी झाला होता. २४ तासांत धरणात ३.६७ टीएमसी पाणी आवक झाली. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सकाळी ११ वाजता सहा वक्र दरवाजे चार फुटांनी उघडून १६ हजार ५६५ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. पण, पावसामुळे दिवसभर धरणात आवक वाढतच गेली. त्यामुळे सायंकाळी साडेपाचला दरवाजे पाच फुटांपर्यंत वर उचलून विसर्ग करण्यात आला. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

धोम, तारळीतून विसर्ग..

जिल्ह्याच्या प्रमुख धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढलेला आहे. २४ तासांत बलकवडी धरण परिसरात १८७, तारळी ५२ आणि उरमोडी धरण क्षेत्रात ४८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. मोठे प्रकल्पात जवळपास १२० टीएमसीवर पाणीसाठा झालेला आहे. तसेच धोम, कण्हेर, तारळी, बलकवडी या धरणांतूनही विसर्ग सुरू आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील जोर येथे २४ तासांत ३१६ मिलिमीटर पाऊस झाला. तर एक जूनपासून आतापर्यंत जोर येथे ३ हजार ५५० मिलिमीटर पर्जन्यमान नोंद झाले आहे.

Web Title: Koyna Dam gates reopened as rains increase in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.