ग्रामसेवकांवर वाढतोय राजकीय दबाव

By Admin | Updated: November 16, 2015 23:41 IST2015-11-16T23:25:47+5:302015-11-16T23:41:24+5:30

ग्रामस्थांची होते फरफट : सत्ताधाऱ्यांच्या ओझ्याखाली दबूनच करावी लागतात कामे

Increasing political pressure on Gram Sevaks | ग्रामसेवकांवर वाढतोय राजकीय दबाव

ग्रामसेवकांवर वाढतोय राजकीय दबाव

प्रताप बडेकर - कासेगाव --स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य घटक म्हणून कार्यरत असणारे ग्रामसेवक तथा अण्णासाहेब यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे. सर्वसामान्यांची कामे करण्याची इच्छा असूनही सत्ताधारी सांगतील त्याप्रमाणेच कामे करावी लागत आहेत. हे चित्र गावोगावी दिसत असून, अण्णासाहेब सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनत चालले आहेत.
राज्याने पंचायत राज धोरण स्वीकारल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आली. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती व गावपातळीवर ग्रामपंचायत उदयास आली. या ग्रामपंचायतीसाठी दैनंदिन कामासाठी सचिव म्हणून ग्रामसेवक हे पद निर्माण केले. शासकीय पातळीवरून येणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत व योग्य गरजूंना त्याचा लाभ व्हावा, हे शासनाचे धोरण असते.
मात्र गावपातळीवर ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीप्रमाणे ज्याची गावावर सत्ता त्याच्या म्हणण्यानुसारच व तो सांगेल त्यालाच या योजनांचा लाभ, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. गावपातळीवर या योजनांची माहिती लोकांना देण्याचे काम ग्रामसेवक करत असतात. या कामाच्या माध्यमातून गावातील लोकांचा त्यांच्याशी संपर्क असतो. मात्र सात्ताधारी आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपल्या मर्जीतल्या लोकांचीच यासाठी निवड करताना दिसत आहेत. त्यामुळे इच्छा असूनही अण्णासाहेबांना सत्ताधाऱ्यांपुढे जाता येत नाही. तसेच मासिक सभा, ग्रामसभा आदी सभांचे प्रोसेडिंग व त्यातील ठराव याबाबतही त्यांना सत्ताधाऱ्यांचेच ऐकावे लागते.
वास्तविक शासन स्तरावरून येणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा गरजूंना फायदा होणे गरजेचे असताना गावोगावचे अण्णासाहेब मात्र इच्छा असूनही कामे करू शकत नाहीत. त्यामुळे हे अण्णासाहेब सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. याला कुठे तरी आळा बसण्याची गरज आहे. अन्यथा ग्रामीण विकासाला त्याचा फटका बसेल.

अधिकाऱ्यांवर मर्यादा..!
काही ग्रामसेवक मोठ्या तडफेने व प्रामाणिकपणे कामे करतात. यामुळे काही वेळेस सत्ताधारी गट व ग्रामसेवकांत संघर्ष होतो. यातूनच सत्ताधारी संबंधित ग्रामसेवकाची बदली अथवा त्याला बडतर्फ करण्यासाठी व्यूहरचना आखतात, अशी उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही मर्यादा येत आहेत.

Web Title: Increasing political pressure on Gram Sevaks