Pune-Bangalore Highway: उंब्रजचा भराव पूलच बनलाय बेकायदा ‘प्रवासी थांबा’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:07 IST2025-11-28T18:07:17+5:302025-11-28T18:07:26+5:30
महामार्गावरील आणि उपमार्गावरील वाहतुकीचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक

Pune-Bangalore Highway: उंब्रजचा भराव पूलच बनलाय बेकायदा ‘प्रवासी थांबा’
अजय जाधव
उंब्रज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील उंब्रज येथील भराव पूल हाच बेकायदेशीर प्रवासी थांबा बनला आहे. एसटी तसेच खासगी बसचालक या पुलावरच थांबा घेत असल्याने प्रवाशांना नाईलाजाने जीव मुठीत घेऊन येथे उभे राहावे लागत आहे. यापूर्वी या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांना आयुष्यभरासाठी अपंगत्व आलेले आहे.
उंब्रज येथे महामार्गालगत एसटीचे प्रशस्त बसस्थानक आहे. मात्र बहुतेक एसटी बसेस बसस्थानकात न थांबता थेट महामार्गाच्या भरावपुलावर थांबतात. पुणे-मुंबई मार्गावरील अनेक खासगी बसगाड्यांचा मुख्य थांबाही उंब्रज भरावपूलच बनला आहे.
वाचा : खंडाळा परिसर ठरतोय अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’; 'या' थांब्यांवर दुर्घटनेचे सावट
उंब्रज व पंचक्रोशीतील, पाटण तालुक्यातील चाफळ, तारळे पंचक्रोशीतील शेकडो गावांतील हजारो विद्यार्थी उंब्रज, कराड, सातारा येथील महाविद्यालयात जाण्यासाठी दररोज येतात. त्यांना रोजच उंब्रजच्या भराव पुलावर उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्याचबरोबर उंब्रज हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आसपासच्या गावांतील शिक्षक व नोकरदार वर्गालाही ये-जा करण्यासाठी याच ठिकाणी उभे राहावे लागते. त्यामुळे भराव पुलावर प्रवाशांची कायम मोठी गर्दी निर्माण होत असते. अपघात घडत असतात. नुकतेच उंब्रजचे एसटी बसस्थानक नव्याने उभारण्यात आले आहे. मात्र हे एसटीचे बसस्थानक फक्त ‘शोपीस’ बनल्याची परिस्थिती दिसत आहे.
उंब्रज भराव पूल हा आधीच मृत्यूचा सापळा ठरत असून, यापूर्वी झालेल्या अनेक अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नुकताच येथे सेगमेंटल पूल मंजूर झाल्याने लवकरच सहापदरीकरणाचे काम सुरू होणार आहे. मात्र हे काम सुरू होण्यापूर्वी महामार्गावरील आणि उपमार्गावरील वाहतुकीचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. अन्यथा वाहतूक कोंडी वाढून अपघातांचे प्रमाण अधिकच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने उंब्रजमधील वाहतूक व्यवस्थेवर तातडीने योग्य तोडगा काढावा. त्यानंतरच सहापदरीकरण व सेगमेंटल पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून होत आहे.