मधमाश्यांच्या उपद्रवामुळे शाळेला सुटी

By Admin | Updated: July 4, 2014 23:47 IST2014-07-04T23:17:37+5:302014-07-04T23:47:48+5:30

आगाशिवनगर येथील प्रकार : दोन दिवस शैक्षणिक कामबंद

Holidays for school due to beeswax nuisance | मधमाश्यांच्या उपद्रवामुळे शाळेला सुटी

मधमाश्यांच्या उपद्रवामुळे शाळेला सुटी


मलकापूर : आगाशिवनगर येथील शाळेच्या इमारतीत मधमाश्यांनी पोळे तयार केल्यामुळे व मधमाश्यांचा उपद्रव वाढल्यामुळे शाळेला दोन दिवस सुटी देण्यात आली. रात्रीच्या वेळी धूर करून मधमाश्यांना तेथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तिसऱ्या दिवशीही माश्या शाळेच्या परिसरातच घोंगावत होत्या.
आगाशिवनगर येथे लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाची ए वन बालवाडी व नूतन मराठी शाळा आहे. सहाशे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शाळेची तीन मजली इमारत असून, उन्हाळ्याच्या सुटीत वर्दळ नसल्यामुळे या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मधमाश्यांचे मोहोळ बसले होते. दुसऱ्या मजल्यावर पोर्चच्या छतालाच मोहोळ असल्याने शाळा व्यवस्थापनाची मोठी पंचाईत झाली. अशातच १६ जूनपासून शाळा सुरू झाली. मात्र, शिक्षकांसह शाळा प्रशासनाने मधमाश्यांच्या मोहोळाचे गांभीर्य ओळखून सुरुवातीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर जाणे टाळले. दिवसभरात विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीही दुसऱ्या मजल्याकडे फिरकत नव्हते. अखेर मधमाश्यांचा वावर व उपद्रव वाढल्यामुळे मधमाश्यांना तेथुन हुसकावण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवार, दि. ३० त्यासाठी शाळेला सुटी देण्यात आली. सोमवारी रात्री धूर करून माश्यांना हुसकावण्याचा प्रयत्न झाला. मात्र, रात्रीच्या वेळी सर्व माशा शाळेच्या ग्राऊंडवरच पडल्या. त्या माश्यांचा ढीग मंगळवारी दुसऱ्या दिवशीही तसाच राहिल्याने शाळा बंद ठेवण्यात आली. तसेच दुसऱ्या मजल्यात मोहोळावरही काही माश्या घोंगावत होत्या.
बुधवारी माश्यांचा उपद्रव कमी झाल्यामुळे शाळेचे दैनंदिन कामही सुरू करण्यात आले. गुरुवारी दुसऱ्या मजल्यावरील मोहोळही शाळा प्रशासनाने काढून टाकले. (प्रतिनिधी)

Web Title: Holidays for school due to beeswax nuisance