रीलसाठी महामार्ग रोखला; नव्या गाडीचे ड्रोनने चित्रीकरण, पाच जणांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:34 IST2025-07-14T12:33:35+5:302025-07-14T12:34:28+5:30

अल्पवयीन मुलाकडून रील व्हायरल

Highway blocked in Satara to reel in new four wheeler, Crime against five persons | रीलसाठी महामार्ग रोखला; नव्या गाडीचे ड्रोनने चित्रीकरण, पाच जणांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना

रीलसाठी महामार्ग रोखला; नव्या गाडीचे ड्रोनने चित्रीकरण, पाच जणांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना

सातारा : नवी चारचाकी खरेदी केल्यानंतर या गाडीचे आगळेवेगळे सेलिब्रेशन करून त्याचे रील सोशल मीडियावर टाकण्यासाठी पाच तरुणांनी चक्क महामार्ग रोखला. इतकेच नव्हे, तर त्याचे ड्रोनने चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरलही केले.

हा प्रकार समोर आल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी पाचही युवकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. हा प्रकार १० जुलै रोजी सायंकाळी चार वाजता बाॅम्बे रेस्टाॅरंट उड्डाणपुलावर घडला.

ओम प्रवीण जाधव (वय २१, रा. तारळे, ता. पाटण, सध्या रा. जुना आरटीओ चाैक, सातारा), कुशल सुभाष कदम (२०, रा. सदर बझार, जरंडेश्वर नाका, सातारा), सोहम महेश शिंदे (२०, रा. शिंगणापूर, ता. माण), निखिल दामोदर महांगडे (२७, रा. परखंदी, ता. वाई), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ओम जाधव याने नवी गाडी खरेदी केली. याचे उद्घाटन करण्यासाठी त्याने इतर मित्रांना त्यांच्या गाड्या घेऊन बाॅम्बे रेस्टॉरंट चाैकातील उड्डाणपुलावर बाेलावले. कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या लेनवर त्यांनी सर्व गाड्या आडव्यातिडव्या उभ्या केल्या. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. ड्रोनने शूटिंग सुरू केले. यात दोन ते तीन मिनिटे गेली. ड्रोनचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सर्व गाड्या वेगात तेथून निघून गेल्या. सोशल मीडियावर या तरुणांनी रील व्हायरल केल्यानंतर साताऱ्यात खळबळ उडाली.

सातारा शहर पोलिसांनी विविध पथके तयार करून या तरुणांचा तातडीने शोध घेतला. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर ड्रोनची परवानगी न घेणे, बेकायदा महामार्ग रोखणे, आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शामराव काळे, अभिजीत यादव, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, सुहास पवार, रमेश शिखरे, नीलेश जाधव आदींनी या कारवाईत भाग घेतला.

यासाठी सारा खटाटोप

सोहम शिंदे याचे ड्रोन होते, तर निखिल महागंडे याने ड्रोनद्वारे शूटिंग केले, तसेच त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर रील व्हायरल केली. अशाप्रकारे हटके रील व्हायरल केल्यानंतर चांगली प्रसिद्धीही मिळेल, शिवाय अशा प्रकारे कोणाला रील बनवायची असेल तर ऑर्डरही मिळेल, हा हेतू ठेवून त्यांनी महामार्ग रोखला, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

Web Title: Highway blocked in Satara to reel in new four wheeler, Crime against five persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.