साताऱ्यात पावसाची उघडझाप, महाबळेश्वरमध्ये दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:32 IST2025-07-02T19:32:16+5:302025-07-02T19:32:35+5:30

सहा धरणात ५७ टक्के पाणीसाठा

Heavy rains in Satara Mahabaleshwar crosses 1500 mm mark | साताऱ्यात पावसाची उघडझाप, महाबळेश्वरमध्ये दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला 

साताऱ्यात पावसाची उघडझाप, महाबळेश्वरमध्ये दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला 

सातारा : सातारा शहरात पावसाची उघडझाप असून, पश्चिम भागात जोर कमी झाला आहे. तरीही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने साठा वाढत आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणात ५६ टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरच्या पावसानेही दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे.

जून महिन्याप्रमाणेच जुलै महिन्याची सुरुवातही पावसाने झाली आहे. त्यातच मागील १५ दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस सुरूच आहे. यामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. सध्या पश्चिमेकडील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी आवक कायम आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. बहुतांश मोठे प्रकल्प ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत भरले आहेत. यामुळे धरणांमधून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे.

बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासात कोयनानगरमध्ये ५८ मिलिमीटर पाऊस झाला, तर नवजा येथे ७० आणि महाबळेश्वरला ५९ मिलिमीटरची नोंद झाली आहे. कोयना धरणक्षेत्रातही पाऊस होत आहे. सकाळच्या सुमारास धरणात २८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. धरण पाणीसाठा ५६.०३ टीएमसी झालेला असून, पाणीसाठ्याची टक्केवारी ५३.२४ इतकी आहे.

२४ तासांत धरणात सुमारे अडीच टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. त्यातच धरणातील साठा वेगाने वाढत असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी नदी विमोचक द्वारमधूनही विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोयनेतून विसर्ग वाढणार आहे. परिणामी कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सहा धरणात ५७ टक्के पाणीसाठा

जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे सहा मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सध्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने या मोठ्या प्रकल्पात एकूण ८४.२१ टीएमसी पाणीसाठा निर्माण झालेला आहे. याची टक्केवारी ५६.६२ इतकी आहे. या प्रमुख धरणांतून एकूण सुमारे पाच हजार क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सुरू झालेला आहे.

Web Title: Heavy rains in Satara Mahabaleshwar crosses 1500 mm mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.