सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणातील विसर्ग कमी, १२९ कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:01 IST2025-08-21T12:24:36+5:302025-08-21T13:01:19+5:30

आठ मंडलांत अतिवृष्टी : नवजा ३८७, महाबळेश्वरला ३०८ मिलिमीटर पाऊस 

Heavy rains ease in Satara district Dam discharge reduced, 129 families relocated | सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणातील विसर्ग कमी, १२९ कुटुंबांचे स्थलांतर

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; धरणातील विसर्ग कमी, १२९ कुटुंबांचे स्थलांतर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी दुपारनंतर कमी झाला. त्यामुळे प्रमुख धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे. तरीही सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे तब्बल ३८७ तर महाबळेश्वरला ३०८ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच आठ महसूल मंडलांतही अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणच्या १२९ कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत होता. यामुळे पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बुधवारी सकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला. यामुळे कोयना वगळता इतर प्रमुख धरणांतील विसर्गही कमी करण्यात आला आहे.

तर सायंकाळच्या सुमारास कोयना धरणातून एकूण ९५ हजार ३०० क्युसेक पाणी विसर्ग सुरू होता. धरणाचे दरवाजे १३ फुटांवर स्थिर होते. त्यामधून ९३ हजार २०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा विसर्ग सुरू होता. तर कोयनेसह प्रमुख सहा धरणांतून एकूण १ लाख २१ हजार ४११ क्युसेक पाणी सोडले जात होते. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत होत्या.

सहा धरणांत १४३ टीएमसी पाणीसाठा..

कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. धरण क्षेत्रात पाऊस असल्याने सायंकाळच्या सुमारास धरणांमध्ये १४२.८५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ही धरणे ९६ टक्के भरली होती.

पाच तालुक्यांतील रस्ते तात्पुरते बंद..

सोमवारपासून मुसळधार पाऊस होत असल्याने मंगळवारपासून अनेक तालुक्यांत काही मार्ग बंद आहेत. यामध्ये पाटण तालुक्यातील चार मार्गांचा समावेश होता. तर महाबळेश्वरसह वाई, सातारा आणि खंडाळा तालुक्यांतील काही मार्ग बंद होते. तर पाटण तालुक्यात २५, कराड ६, महाबळेश्वर ८, वाई ४० आणि सातारा तालुक्यातील ५० कुटुंबांतील ३६१ लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेले आहे.

पसरणी, पाचगणी, तापोळ्याला अतिवृष्टी..

बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील आठ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. सातारा तालुक्यात तासगाव मंडलात ७८, पाटण तालुक्यातील चाफळला ६६, वाई तालुक्यात पसरणी येथे ९५, कोरेगाव तालुक्यात वाठार किरोली ६९, महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर मंडल २७३, तापोळा १०९, पाचगणी ७३ आणि लामजला १७० मिलिमीटर पाऊस नोंद झाला.

कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठा

कोयना धरणात १०१.४२ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ९६.४० टक्के भरले आहे. तसेच सायंकाळी धरणात १ लाख ११ हजार १६६ क्युसेक वेगाने पाणी आवक सुरू होती. तर धरणाचे सहा वक्र दरवाजे १३ फुटांवर असून, त्यातून ९३ हजार २०० आणि पायथा वीजगृह २ हजार १००, असा एकूण ९५ हजार ३०० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात होता.

Web Title: Heavy rains ease in Satara district Dam discharge reduced, 129 families relocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.