धुवाधार पाऊस; सातारा जिल्ह्यातील वीर, कण्हेर, धोम धरणांतून मोठा विसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:28 IST2025-07-28T15:28:00+5:302025-07-28T15:28:58+5:30
धरणांतून विसर्ग वाढला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

छाया-कुणाल जाधव
सातारा : जिल्ह्याचा पश्चिम भाग रविवारी मुसळधार पावसाने चिंब झाला. प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून, रविवारी सायंकाळी विसर्ग वाढवून ३१,७४६ क्युसेक पाणीनदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात सायंकाळपर्यंत ८५.३० टीएमसी पाणीसाठा होता.
दरवर्षी रिमझिम बरसणाऱ्या श्रावण महिन्यात आषाढ सरी कोसळू लागल्या आहेत. पाटण, जावली, सातारा तालुक्यांचा पश्चिम भाग, महाबळेश्वर तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यामुळे विसर्ग वाढविण्यात आला आहे.
काेयना धरणात रविवारी सायंकाळपर्यंत ८५.३० टीएमसी साठा झाला होता, तर आवक ५४,८०१ क्युसेक इतकी होती. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे पाच फुटांवरून साडेसहा फुटांपर्यंत उघडून २९,६४६ क्युसेक विसर्ग सुरू केला. याशिवाय पायथा विद्युतगृहातूनही २१०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
यामुळे कोयना नदीमध्ये एकूण ३१ हजार ७४६ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कोयना व कृष्णा नदीची पातळी वाढत असल्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरणे, शेती साहित्य व जनावरे ठेवणे टाळावे, असे आवाहन सातारा सिंचन विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, पाचगणीत न्यू इरा शाळेजवळील संरक्षक भिंत कोसळल्याने प्रवासी वाहतूक पूर्णतः बंद झाली.
वीर, कण्हेर, धोम मधूनही मोठा विसर्ग
- वीर धरणाचा विसर्ग रविवारी सकाळी सहा वाजता वाढवून नीरा नदी पात्रात १४,४९६ क्युसेक पाणी सोडण्यात आले.
- कण्हेर धरणातून येवा लक्षात घेऊन रविवारी सकाळी नऊ वाजता वेण्णा नदी पात्रात ५५५० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. हामदाबाज-किडगाव व करंजे-म्हसवे गावांना जोडणाऱ्या पुलांवरून पाणी जाण्याची शक्यता आहे. यामुळे हे रस्ते बंद केले आहेत.
- धोम धरण ९०.२३ टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे येवा वाढला आहे. त्यामुळे विसर्ग ७२७० क्युसेक करण्यात आला.
- उरमोडी धरणातून दुपारी १२ वाजता ५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.
प्रमुख धरणांमधील पाणी पातळी (टीएमसीमध्ये)
- कोयना - ८५.३
- धोम - १२.२७
- बलवकडी - ३.४८
- कण्हेर - ८.७७
- उरमोडी - ८.४९
- तारळी - ५.०४