Satara Crime: चिमणगावात दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:28 IST2025-10-06T13:28:26+5:302025-10-06T13:28:39+5:30
तिघांना अटक, दोघे फरार

Satara Crime: चिमणगावात दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी गजाआड, नागरिकांच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे गुरुवार, दि. २ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेली टोळी जागरूक नागरिकांमुळे पोलिसांच्या हाती लागली आहे. याप्रकरणी तीनजणांविरोधात दरोड्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून रविवारी मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र जयसिंग सावंत यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मल्हारी शिवाजी मदने, साहिल कांतीलाल पाटोळे आणि ऋतुराज मारुती जाधव (सर्व रा. वनवासवाडी बुध, ता. खटाव) यांच्यासह दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण एका दुचाकीवरून चिमणगाव येथे आले होते. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यांच्याजवळ एक कोयता, एक चाकू, मिरची पूड जवळ बाळगली होती.
दरोडेखोरांची चाहूल लागताच जागरूक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर अटक केली. कोरेगाव न्यायालयात त्यांना हजर केले असता कोठडी देण्यात आली. परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक अतुल जगदाळे तपास करत आहेत. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांनी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या आहेत.