दरमहा दहा टक्क्यांचा फंडा, सोळा लाखांचा घातला गंडा; साताऱ्यात कंपनी मालकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:39 IST2026-01-06T13:38:40+5:302026-01-06T13:39:04+5:30
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष

दरमहा दहा टक्क्यांचा फंडा, सोळा लाखांचा घातला गंडा; साताऱ्यात कंपनी मालकावर गुन्हा
सातारा : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आर. के. ट्रेडिंग कॅपिटल’चा मालक रोहित विनोद काठाळे (वय ३५, मंगळवार पेठ, सातारा) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत कुणाल सुभाष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पवार हे २०२३ मध्ये काठाळे यांच्या राजवाडा परिसरातील कार्यालयात गेले होते. त्यावेळी काठाळे याने फॉरेक्स व इंडियन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून पवार यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये ऑनलाईन व एनईएफटीद्वारे १६ लाख रुपये गुंतविले. मात्र, कोणताही परतावा मिळाला नाही. पवार यांनी वेळोवेळी परताव्याची मागणी केली असता संशयिताने टाळाटाळ केली.
संशयित फसवत असल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली परंतु आरोपीने रक्कमदेखील परत दिली नाही. त्यानंतर सप्टेंबर २०२५ पासून संशयिताचा मोबाईल फोन बंद असून तो पत्त्यावर राहत नसल्याचेही समजले. यानंतर पवार यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. आपल्यासारख्या अनेक नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचेही पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.
संशयिताचा मोबाईल बंद
संशयित काठाळे याचा मोबाईल २७ सप्टेंबरपासून बंद आहे. त्याच्याकडून कितीजणांची फसवणूक झाली, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.